महाड : संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिनोत्सवानिमित्त भरलेल्या जत्रोत्सवात गुरु वारी महाडमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळणार असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. संपूर्ण जत्रोत्सवाच्या परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर ठेवण्यात आलेली आहे. तहसीलदार संदीप कदम, नगर परिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. देवस्थानचे सरपंच दिलीप पार्टे यांनी छबिना उत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मंदिर परिसरात तसेच विस्तीर्ण अशा गाडीतळ परिसरात शेकडो दुकाने थाटण्यात आली असून, संसारोपयोगी वस्तू, शोभेच्या वस्तू, खेळणी, सौंदर्यप्रसाधनांसह करमणुकीच्या साधनांचीही मोठ्या प्रमाणावर रेलचेल पाहायला मिळणार आहे. सुमारे पाचपेक्षा अधिक उंचच उंच आकाशपाळणे, डिस्को डान्स आदी करमणुकीची साधने या जत्रोत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहेत. ६ मार्चपासून सुरू झालेल्या या छबिनोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. (वार्ताहर)
महाडमध्ये आज वीरेश्वर महाराजांचा छबिनोत्सव
By admin | Updated: March 10, 2016 02:17 IST