नवी मुंबई : नेरूळ येथे सायन-पनवेल मार्गाच्या सौंदर्यीकरणात अनधिकृत पार्किंग बाधा ठरत आहे. डी. वाय. पाटील स्टेडिअम प्रशासन त्या जागेवर हिरवळ करण्यास इच्छुक आहे. परंतु अनधिकृत पार्किंगची पाठराखण करीत लोकप्रतिनिधीची त्यांची पर्यायी सोय करण्याची मागणी करीत असल्याची बाब अधिकाऱ्यांनी उघड केली.नेरूळ येथील सायन-पनवेल मार्गाला लागूनच आंतरराष्ट्रीय दर्जाचे डी.वाय. पाटील स्टेडिअम आहे. त्याच्यासमोरील सर्व्हिस रोडलगत मोठ्या प्रमाणात मोकळी जागा आहे. सायन-पनवेल मार्ग व सर्व्हिस रोडदरम्यानच्या या जागेवर डी.वाय. पाटील प्रशासन स्वखर्चाने हिरवळ करण्यास इच्छुक आहे. त्यांनी पत्राद्वारे महापालिकेलाही यासंबंधीची माहिती दिली आहे. यामुळे सायन-पनवेल मार्गाच्या सुशोभीकरणात भर पडणार आहे. तर पूर्वीपासून त्या ठिकाणी असलेल्या झाडांचे जतन करणेही शक्य होणार आहे. मात्र सायन-पनवेल मार्गालगत हिरवळ करण्याच्या या कामात त्या ठिकाणची अनधिकृत पार्किंग बाधा ठरत आहे. त्या ठिकाणी सर्व्हिस रोडलगत शंभरहून अधिक स्कूलबस उभ्या असतात. त्यासाठी संबंधितांकडून जुन्या वृक्षांची तोड करून जागेवर भराव देखील टाकण्यात आलेला आहे. शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकण्यासाठी सर्वच मुख्य मार्गालगत हिरवळ करण्याची गरज सभागृह नेता जे. डी. सुतार यांनी व्यक्त केली. परंतु एखाद्या अनधिकृत पार्किंगमुळे शहराच्या सौंदर्यीकरणाचे काम रखडते ही खेदाची बाब असल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला. नगरसेवक रवींद्र इथापे यांनीही त्या खासगी स्कूलबस ठेकेदाराने नेरूळ परिसरातील सर्वच रस्त्यांवर अवैध पार्किंगचे जाळे पसरवले असल्याचा संताप व्यक्त केला. तर संपूर्ण शहरात असेच चित्र असून कोपरखैरणेतही रस्त्यालगतची अवैध पार्किंग रहदारीला अडथळा ठरत असल्याची बाब नगरसेवक शंकर मोरे यांनी सभागृहापुढे मांडली. यावेळी नगरसेवक शिवराम पाटील व रामचंद्र घरत यांनी शहरात मोठ्या संख्येने स्कूलबस असून त्यांच्या पार्किंगची समस्या गंभीर असल्याचे सांगितले. खासगी वाहनांच्या पार्किंग समस्येबाबत स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के यांनीही गांभीर्य व्यक्त केले. परंतु डी. वाय. पाटीललगत हिरवळीचा मुद्दा आला की त्या ठिकाणी भूमिगत गॅस पाइप व विद्युत वायरी असल्याचे सांगून कामाला बगल दिली जात असल्याचा संताप व्यक्त केला. तर हिरवळ केल्यानंतर झाडे व गवताने भूमिगत वाहिन्यांना बाधा होऊ शकते की अनेक स्कूलबसच्या पार्किंगमुळे, ही बाब देखील प्रशासनाने जाणून त्या ठिकाणचा हिरवळीतला अडथळा हटवण्याचे प्रशासनाला सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी सदर पार्किंगवर कारवाई होणार असताना नगरसेविका मीरा पाटील यांनी आयुक्तांना पत्र देऊन कारवाईपूर्वी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्याची मागणी केल्याचे सांगितले. यावरून लोकप्रतिनिधीच अनधिकृत पार्किंगची पाठराखण करीत असल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)
हिरवळीला अनधिकृत पार्किंगची बाधा
By admin | Updated: March 10, 2016 02:26 IST