नवी मुंबई : महापालिकेने अतिक्रमणांच्या विरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. अतिक्रमण विभागाने गुरूवारी विनापरवाना कार्यरत असलेल्या बेलापूरमधील दोन पेट्रोल पंपांना सील ठोकले. त्यामुळे शहरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.महापालिका आयुक्त यांना काही दिवसांपूर्वी या पेट्रोलपंपाविषयी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापार्श्वभूमीवर आयुक्तांनी नगररचना विभागाला चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नगररचना विभागाने बेलापूर विभागातील तीन पेट्रोल पंपाची चौकशी केली असता यापैकी दोन पेट्रोलपंप चालकांनी भोगवटा प्रमाणपत्र न घेताच व्यावसायिक वापर सुरू केल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही मालमत्ताधारकांना बुधवारी चोवीस तासांची नोटीस बजावण्यात आली होती. परंतु त्यानंतरही वापर सुरूच ठेवल्याने अखेर गुरूवारी अतिक्रमण विभागाने या दोन्ही पेट्रोल पंपांना सील ठोकण्याची कारवाई केली. बेलापूर सेक्टर १५ येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरॅशन आणि सेक्टर २९ येथील इंडियन आॅईल कॉर्पोरेशन अशी या दोन पेट्रोल पंपाची नावे आहेत. महापालिका आयुक्त मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे, नगररचना संचालक सुनील हजारे व सहाय्यक आयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)
बेलापूरमधील दोन पेट्रोल पंप सील
By admin | Updated: June 17, 2016 00:59 IST