नवी मुंबई : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये बच्चेकंपनीबरोबरच थोरा-मोठ्यांनाही पर्यटनाचे आकर्षण वाटते. वाशी मिनी सीशोर येथे जलपर्यटन सुरू झाले असून, नवी मुंबईतील नागरिकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. हिंदजल प्रवासी वाहतूक सरकारी संस्थेच्या वतीने जानेवारीमध्ये सुरू केलेल्या बेलापूर ते एलिफंटा फेरीबोटसेवेलाही पर्यटकांनी पाठ फिरविली असली, तरी मिनी सीशोर येथे सुरू करण्यात आलेल्या जलपर्यटनाकडे मात्र नवी मुंबईकरांचा वाढता कल दिसून येतो.नवी मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या वाशी मिनी सीशोरला भेट देणाºया नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्या परिसरातील उद्यानांमध्येही बच्चेकंपनीने मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळते. येथे बोटिंगसेवा सुरू करण्यात आली असून, या जलपर्यटनालाही मोठ्या प्रमाणात वाव मिळत आहे. संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी तरुणवर्गाबरोबरच, ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने भेट देत असून, जलपर्यटनाचा मनमुराद आस्वाद घेताना पाहायला मिळतात. ५० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत दर आकारले जात असून, तासभराची सैर करण्यासाठी या ठिकाणी सर्वच वयोगटातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. आजूबाजूच्या परिसरात राहणारे नागरिकही मिनी सीशोर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येत असून, संध्याकाळी त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. वॉटर वॉकिंग बॉल हे यंदाचे मुख्य आकर्षण ठरले असून, याकरिता दररोज पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. त्याचबरोबर वॉटर स्कूटर, पेडलबोट, मोटारबोट यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत या जलपर्यटनाचा आस्वाद नागरिकांना घेता येणार आहे. याकरिता वयाची कसलीही अट नसून, तीन वर्षांवरील मुलांना या पर्यटनाचा लाभ घेता येणार आहे.बच्चे कंपनीची धम्मालपरीक्षा संपल्या असून, अनेक शाळांमध्ये सुट्टीला सुरुवात झालेली आहे. या सुट्टीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी बच्चेकंपनीने वाशीतील मिनी सीशोर परिरसातील उद्यानामध्ये असलेल्या टॉय ट्रेनमध्ये बसण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. संध्याकाळच्या वेळी येथील उद्यानांमध्ये गर्दीचे प्रमाण वाढत असून, मुलांकरिता सुरू करण्यात आलेल्या टॉय ट्रेनला चांगलीच पसंती मिळाली आहे. या ठिकाणी खाद्यपदार्थविक्रेत्यांनी हजेरी लावत, या ठिकाणी हातगाड्या लावून व्यवसाय सुरू केला आहे.
वाशी मिनी सीशोर येथे पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 04:10 IST