पालघर : कपासे ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत शौचालयासाठी बारा हजार रुपयांचा लाभ देतानाही ठराविक लाभार्थ्यांनाच या याजनेचा लाभ देऊन ग्रामसेविका सुचिता पाटील या मनमानी कारभार करीत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी पालघरचे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.पालघर जिल्ह्यात एकूण १ लाख २० हजार शौचालयांची अत्यंत आवश्यकता असून डिसेंबर २०१७पर्यंत ही सर्व शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यानी डोळ्यासमोर ठेवले आहे. त्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत अनुसूचित जाती जमाती पैकी ग्रामपंचायत स्तरावरून महिला कुटुंबप्रमुख अपंग, अल्पभूधारक असलेल्या लाभार्थ्यांना शौचालय बांधून त्याचा वापर सुरू करताक्षणी बारा हजार रुपयांचा लाभ मिळतो. सफाळे येथील कपासे ग्रामपंचायत अंतर्गत ठाकूरपाडा, ठाणे पाडा, कपासे येथील लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत शौचालये मंजूर करताना ग्रामसेविका सुचिता पाटील, शिपाई विकास नडगे व संगणक चालक विपुला पाटील या मनमानी कारभार करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची यादी बनविताना सरपंच गजानन पागी यांनाही विश्वासात घेतले गेले नसल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. या योजनेंतर्गत लाभार्थ्याला लाभ देताना बनविलेल्या यादीमध्ये ज्यांच्या घरात शौचालय आहेत त्यांनाही लाभ देण्यात आला असून शौचालयाविना राहणाऱ्या कुटुंबाला मात्र शोचालयापासून वंचित ठेवले जात आहे. तर काही कुटुंबातील दोन दोन तीन तीन नावे घुसविण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. ज्यांची २०११-१२ मध्ये घरेच बांधली गेली नव्हती अशा लोकांना याचा लाभ दिल्याचे तक्रारदारांनी सांगितले. ग्रामसेविका पाटील यांच्याशी संपर्क साधला असता मी पाच मिनिटांनी फोन करते असे सांगून फोन बंद केला. मात्र त्यानंतर एका व्यक्तीने यासंदर्भात फोन करून वार्ताहरावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करतो असे गटविकास अधिकारी डी.वाय. जाधव यांनी लोकमतला सांगितले.
वशिलेबाजांनाच शौचालयाचे अनुदान?
By admin | Updated: January 1, 2015 23:17 IST