नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्थानकात चोरट्यांचा वावर वाढला असून त्यांच्याकडून पोलिसांनादेखील मारहाण होऊ लागली आहे. सोमवारी मध्यरात्री घडलेल्या अशाच एका प्रकारामुळे महिला प्रवाशांमध्ये रात्रीच्या प्रवासाची भीती निर्माण झाली आहे. हे चोरटे चालत्या रेल्वेत महिलांच्या डब्यात घुसून त्यांच्याकडील मोबाइल व पर्स चोरण्याचे धाडस करू लागले आहेत.सोमवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास हार्बर मार्गावरील रेल्वेच्या महिला डब्यात हा प्रकार घडला. पनवेलच्या दिशेने जाणारी रेल्वे सानपाडा स्थानकात आली असता एका अज्ञात तरुणाने महिलांच्या डब्यात प्रवेश केला. ही व्यक्ती महिलांच्या दिशेने जात असतानाच त्याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या वयस्कर रेल्वे पोलिसाने त्याला हटकले. मात्र तोपर्यंत रेल्वे सुरू झाल्यामुळे चुकून महिला डब्यात आलो असून, पुढच्या जुईनगर स्थानकात उतरतो असे त्याने पोलिसाला सांगितले. यानंतर दोघेही रेल्वेच्या दरवाजाजवळच उभे होते. लोकल जुईनगर स्थानकात येताच त्या तरुणाने रेल्वे पोलिसाच्या श्रीमुखात मारून रेल्वेतून उडी मारून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार महिला प्रवाशांच्या समक्ष घडला. त्यामुळे पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंतच्या वाढलेले चोरट्यांचे धाडस पाहून महिला प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हे चोरटे जर पोलिसांवर हल्ला करु शकतात, तर सर्वसामान्य महिलांना लुटण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात अशी भिती महिलांकडून व्यक्त होत आहे. परंतु प्रवाशांच्या समक्ष घडलेल्या या प्रकाराची तक्रार त्या पोलीसाने केलेली नसल्याचे दिसून येत आहे. चोरट्याकडून पोलिसाला मारहाण झालेल्या कसल्याच प्रकाराची नोंद झालेली नसल्याचे वाशी रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रमोद भावरे यांनी सांगितले.काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे महिलांच्या डब्यात प्रवेश केलेल्या तरुणाने एका महिलेचा मोबाईल चोरुन पळ काढला होता. याची तक्रार देखिल वाशी रेल्वे पोलीसांकडे करण्यात आलेली आहे. हा प्रकार रात्रीच्या सव्वाबारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास सानपाडा रेल्वेस्थानकात घडला होता. यावरुन सानपाडा रेल्वेस्थानकात चोरट्यांचा वावर असल्याचे स्पष्ट होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या स्थानकाच्या इमारत आवारामध्ये जागो जागी गर्दुले व तृतीयपंथीचे अड्डे तयार झालेले आहेत. रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने ते त्याठिकाणी जमाव करुन बसल्याचे पहायला मिळत असते. त्यापैकी काहींनी फलाटावर जाण्याच्या जिन्यावरच ताबा मिळवुन त्याठिकाणी नशा करत बसलेले असतात. त्यांच्याकडूनच अशी गुन्हेगारी कृत्ये केली जात असल्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
चोरट्याने पोलिसाच्या श्रीमुखात लगावली
By admin | Updated: August 17, 2016 03:17 IST