नारायण जाधव
नवी मुंबई : मुंबईसह राज्यातील रस्त्यांवर प्रति चौरस किलोमीटरनुसार बीजिंग, शांघाय, टोकियो या जागतिक महानगरांपेक्षाही जास्त वाहने आहेत. यामुळे राज्यात वाहन पार्किंगची मोठी डोकेदुखी निर्माण झाली असून, यावर उपाय म्हणून शासनाने एकात्मिक पार्किंग धोरण तयार केले आहे. त्यानुसार पार्किंगसाठी जागा असेल, तरच कार खरेदी करता येणार आहे. हे धोरण आता तयार झाले असून, त्याचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमात करण्यात आले आहे.
मुंबईत प्रति चौरस किमी ८,५०८ वाहने (कार २,५१२) आहेत. वाहनांचा आकडा बीजिंगमध्ये ३८९, शांघायमध्ये ८४९ आणि टोकियोमध्ये १,८०० एवढा आहे. या आकडेवारीमुळे त्यामुळे मोठी लोकसंख्या असलेल्या जागतिक शहरांच्या तुलनेत मुंबईतील वाहनसंख्या खूपच जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राची वाहन घनताही प्रति चौरस किमी १२९३ वाहने एवढी आहे.
राज्यात वाहनसंख्येत वाढ
वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडीसह वायुप्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी परिवहन विभागाने हे पार्किंग धोरण तयार केले. त्यातील माहितीनुसार, २००१ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या आकडेवारीप्रमाणे नोंदणीकृत वाहन संख्येत ८.२% वाढ झाली आहे.
२५.८२ लाख नवीन वाहनांची २०२३-२४ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात नोंदणी झाली आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक कमी
वाढत्या लोकसंख्येमुळे २००५ ते २०१४ दरम्यान मुंबईत दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या ३१ टक्क्यांनी वाढली आहे. ती १.०७ कोटीवरून १.४१ कोटी झाली.
त्या तुलनेत सार्वजनिक वाहतुकीद्वारे होणाऱ्या फेऱ्यांचा वाटा २१ टक्क्यांनी कमी झाला आहे. यात बस आणि उपनगरीय रेल्वे फेऱ्या अनुक्रमे ११ टक्के आणि १२ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
याउलट, वैयक्तिक वाहने १५.६ टक्के वाढली आहेत. ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील वाढत्या विकासामुळे सरासरी प्रवास लांबी ११.९ किमीवरून १८.३ किमीपर्यंत लक्षणीय वाढल्याने महामुंबईत वाहतुकीची डोकेदुखी आणखीच वाढली आहे.
नव्या पार्किंग धोरणाच्या निमित्ताने समोर आलेली ही आकडेवारी गंभीर असून याबाबत राज्य सरकारला तातडीने उपाययोजना कराव्या लागणार असल्याचे मत आता तज्ज्ञांमध्ये व्यक्त होत आहे.