नवी मुंबई : सप्तरंगांची उधळण करत शहरातील तरुणवर्ग, बच्चेकंपनी, तसेच ज्येष्ठांनी रस्त्यावर उतरून धुळवड साजरी केली. शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून धुळवड साजरी केली. अनेक ठिकाणी जलबचतीची विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शहरातील स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांचा विशेष सहभाग होता. शहरातील ढोल-ताशा पथकांनी कोरडी होळी खेळत एकमेकांना शुभेच्छा देत रंगोत्सव साजरा केला. सण साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेत पाण्याचा वापर टाळून नैसर्गिक रंगांची उधळण करण्यात आली. तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना दिला जाणारा अनमोल संदेश म्हणजे यंदा होळी साजरी करा पण फक्त टिळा लावून, यामुळे रंग धुण्यासाठीदेखील पाण्याचा जास्त वापर केला जाणार नाही, अशा संदेशाचे पालन करत बेलापूर तसेच वाशीतील सोसायट्यांमध्ये टिळा रंगपंचमी असा आगळ््यावेगळ््या पध्दतीने रंगोत्सव साजरा करण्यात आला. इकोफ्रेंडली पध्दतीने होळी साजरी करण्याकडे युवा पिढीचा मोठ्या प्रमाणात कल दिसून आला. काही सोसायट्यांमध्ये फुलांची उधळण करत रंगोत्सव साजरा करण्यात आला, तर महिलावर्गाने फुगड्या खेळून एकत्र येऊन एकमेकांवर फुले उधळून फुलांच्या विविध रंगांनी रंगोत्सव साजरा केला. यंदा नैसर्गिक रंगांना मागणी असली तरीदेखील रसायनमिश्रित रंगही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते.
सप्तरंगांची उधळण
By admin | Updated: March 14, 2017 04:13 IST