ठाणे : महाराष्ट्रातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसाचा व अतिथंडीचा फटका भाज्यांना बसला असल्यामुळे पालेभाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहे. या महागड्या भाज्यांनी सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळविले असून कोथिंबीरने अर्धशतक गाठले आहे. टोमॅटो, गवार, वांगीही महागाईच्या टोपलीत जाऊन बसली आहे. या दरांमुळे गिऱ्हाइकांबरोबर विक्रेत्यांमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे. ठाण्याच्या बाजारपेठांमध्ये भाज्यांच्या दरांनी उच्चांकच गाठला आहे. मालाची आवक घटली असल्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. कधी दिलासा तर कधी महागाईचा धक्का देणाऱ्या कोथिंबीरचे दर सर्व पालेभाज्यांमध्ये जास्तच कडाडले आहेत. कोथिंबीरबरोबर मेथीचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. येत्या काही दिवसांत हे दर असेच राहतील, अशी शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे. फळभाज्यांमध्ये इतर भाज्या स्वस्त असल्या तरी टोमॅटो, वांगी आणि गवार मात्र प्रचंड महागली आहे. त्यामुळे खरेदीचे प्रमाणदेखील घटले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
पालेभाज्यांचे दर झाले अव्वाच्या सव्वा!
By admin | Updated: January 4, 2016 01:59 IST