नेरळ : कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतीची ग्रामसभा मुद्रांक शुल्काच्या मुद्द्यावर चांगलीच गाजली. मागील तीन वर्षांत ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या मुद्रांक शुल्क निधीचा गैरवापर झाला असल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामसभा सुन्न झाली. ग्रामस्थ प्रवीण शिंगटे यांनी माहितीच्या अधिकारात ही धक्कादायक बाब उघड केली आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्क प्रकरणाची गांभीर्याने चौकशी व्हावी, अशी मागणी पोशीर ग्रामस्थांनी केली आहे.पोशीर ग्रामपंचायतीची ग्रामसभा १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनी घेण्यात आली. ग्रामसभेकरिता २०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. या ग्रामस्थांना आचारसंहिता असल्याने ग्रामसभा होणार नाही, अशी माहिती खुद्द ग्रामसेवक डी.के.कोलसकर यांनी दिली. यावर येथील ग्रामस्थ प्रवीण शिंगटे यांनी गटविकास अधिकारी कर्जत यांच्याशी संपर्क साधून शहानिशा करून घेतली असता फक्त ठराव घेऊ नका, ग्रामसभा घेण्यास हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले. मुद्रांक शुल्काच्या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. जी माहिती ग्रामसेवकांनी ग्रामसभेला जाहीर करून द्यायची असते, ती माहिती ग्रामस्थांना माहिती अधिकार वापरूनही मिळत नाही याबद्दल संताप व्यक्त होत आहे. गेल्या तीन आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या मुद्रांक शुल्काचा ग्रामपंचायतीने कसा वापर केला याची माहिती अधिकारान्वये प्राप्त झालेली माहिती प्रवीण शिंगटें यांनी ग्रामस्थांना दिल्यानंतर ग्रामसभा सुन्न झाली. या निधीची कशा प्रकारे उधळपट्टी करण्यात आली आहे याची माहिती उघड झाली असून यावर ग्रामसेवक डी.के. कोलसकर यांना ग्रामस्थांनी विचारणा केल्यावरही माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी तसेच या निधीचा अपहार झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत असून चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.अनेक कामे झालीच नाहीत तर मग चेक कसे काढण्यात आले या प्रश्नावरदेखील ग्रामसेवक कोलसकर गप्प राहिले. प्रत्यक्षात इतक्या मोठ्या रकमांची कामे झालेलीच नाहीत असा ग्रामस्थांचा आरोप आहे. ज्या व्यक्तींच्या नावावर चेक काढण्यात आले त्यांना त्याविषयी काही माहीत नसल्याचे समोर आले. (वार्ताहर)
पोशीरच्या ‘मुद्रांक शुल्क’चा चुराडा
By admin | Updated: August 17, 2016 03:05 IST