मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि सेवानिवृत्त कर्मचार्यांना आणखी १० टक्के महागाई भत्ता देण्याचा आदेश शासनाने आज जारी केला. त्यामुळे त्यांना आता १०० टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा १९ लाख कर्मचारी, अधिकारी आणि ६ लाख सेवानिवृत्तांना होणार आहे.चालू महिन्याच्या पगारापासूनच ही वाढ दिली जाणार आहे. जानेवारी ते एप्रिलपर्यंतची १० टक्के फरकाची थकबाकी देण्याचाही निर्णय झाला आहे. ती लवकरच दिली जाणार आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता १०० टक्के केल्यानंतर नियमाप्रमाणे राज्य कर्मचार्यांनाही तो लागू करावा, अशी मागणी अधिकारी आणि कर्मचार्यांच्या संघटनांनी केली होती. राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे यांनी आजच्या निर्णयाचे स्वागत केले. (विशेष प्रतिनिधी)
राज्य कर्मचार्यांना आता १०० टक्के महागाई भत्ता
By admin | Updated: May 7, 2014 21:19 IST