नवी मुंबई : शासनाच्या निर्णयानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सायबर लॅब सुरू करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सोमवारी या लॅबचे अनावरण करण्यात आले. या लॅबमुळे नवी मुंबईत घडणाऱ्या सायबर गुन्ह्याच्या तपासाकरिता आवश्यक असलेले डिजिटल पुरावे गोळा करण्यास पोलिसांना मदत होणार आहे.२१ व्या शतकातले शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत गुन्हेगारीची पद्धतदेखील आधुनिक स्वरूपाची होत चालली आहे. आॅनलाइन लॉटरी, मोबाइल बँकिंग, ई-मेल हॅक करून, तसेच इतर विविध प्रकारे फसवणुकीचे गुन्हे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात घडत आहेत. मागील काही दिवसांत अशा गुन्ह्यामध्ये कमालीची वाढ झालेली आहे. अशा प्रकारच्या तब्बल १६०० सायबर गुन्ह्यांची नोंद गतवर्षी नवी मुंबई पोलिसांकडे झालेली आहे. गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेचे स्वतंत्र सायबर सेलदेखील आहे. मात्र, सायबर गुन्ह्यात वापरले गेलेले तंत्रज्ञान जप्त केल्यानंतर, त्यामधून पुरावे गोळा करण्यासाठी ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जायचे. यामध्ये बराच कालावधी निघून जायचा. त्यामुळे तपासाचा विलंब होऊन गुन्हेगाराला बचावाची संधी मिळत होती. अशीच परिस्थिती राज्यातल्या इतर पोलिसांची असल्यामुळे शासनाने ४४ जिल्ह्यात पोलिसांकरिता सायबर लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, तर सोमवारी स्वातंत्र दिनाच्या औचित्यावर सर्वच ठिकाणच्या सायबर लॅबचे अनावरण करण्यात आले. त्यानुसार, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात लॅबच्या अनावरण प्रसंगी विभागीय कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक, सहआयुक्त मधुकर पाण्डेय, गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पोलीस आयुक्तालयात लॅब सुरू झाल्याने सायबर गुन्ह्यातील मोबाइल, संगणक अथवा इतर तंत्रज्ञात फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवायची गरज भासणार नाही. लॅबमध्ये सायबर गुन्ह्याच्या तपासाचे प्रशिक्षण घेतलेले २ अधिकारी व चार कर्मचारी कार्यरत असणार आहेत. (प्रतिनिधी)
सायबर गुन्ह्याच्या तपासाला गती
By admin | Updated: August 16, 2016 04:49 IST