नवी मुंबई : शहरातील कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित विशेष सभा रात्री साडेदहा वाजेपर्यंत सुरू होती. दहा तास सुरू असलेल्या चर्चेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी आरोग्य विभागावर भ्रष्टाचारासह गटबाजीचे आरोप केले. मात्र या चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नाही. प्रशासनाने आरोपांचे व लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तरच दिले नाही. नवी मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरियाचे थैमान सुरू झाले आहे. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडली असून त्यावर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रससह विरोधकांनी आरोग्य विभागास भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. अधिकाऱ्यांमध्ये गटबाजी सुरू आहे. डॉक्टर व्यवस्थित काम करत नाहीत. हिरानंदानीमध्ये योग्य उपचार मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. दुपारी १२ वाजता सुरू झालेली सभा रात्री साडेदहा वाजेपर्यंत सुरू होती. एक तासाची सुटी वगळता जवळपास दहा तास चर्चा सुरू होती. सर्वांनी आरोग्य यंत्रणेमधील चुका निदर्शनास आणून दिल्या. अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणला. विशेष सभेतील चर्चा संपत आल्यानंतर आयुक्त दिनेश वाघमारे सभागृहातून निघून दालनात जावून बसले. महापौरांनी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपक परोपकारी यांना उत्तर देण्यासाठी बोलावले परंतु ते ५ मिनिटे फक्त उभे राहिले. त्यांची दोलायमान स्थिती पाहून महापौरांनी सर्व सदस्यांच्या प्रश्नांवर सविस्तर उत्तर तयार करा. या सभेविषयी सविस्तर अहवाल १६ सप्टेंबरला सर्वांसमोर सादर करा असे सांगून सभा संपल्याचे जाहीर केले. प्रशासनाने काहीच उत्तर दिले नसल्यामुळे दिवसभर चर्चा कशासाठी केली असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. आरोग्य विभागाची तपासणी करण्यासाठी चौकशी समिती नेमली पाहिजे. रुग्णालयामध्ये जेनेरिक औषधांचे केंद्र सुरू झाले पाहिजे. आरोग्य विभागाने प्रत्येक वर्षी काय काम केले, किती नागरिकांना लाभ मिळवून दिला त्याचा अहवाल सादर केला पाहिजे. - जयवंत सुतार, सभागृह नेतेमहापालिकेची आरोग्य यंत्रणा फक्त नावापुरती शिल्लक आहे. शहरवासीयांना योग्य उपचार मिळत नाहीत. साथीचे आजार नियंत्रणात येत नाहीत. पालिका रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयांची प्रयोगशाळा झाली असून प्रशासन जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. - विजय चौगुले, विरोधी पक्षनेते डॉक्टर सर्व टेंडरवाले झाले आहेत. ऐरोलीतील रुग्णालयाला मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी परवानगी जाणीवपूर्वक दिली नव्हती. आरोग्याचा पूर्णपणे खेळखंडोबा झाला आहे. - अविनाश लाड, उपमहापौर आरोग्य विभागास कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. या विभागाचे सर्व प्रस्ताव तत्काळ मंजूर केले. परंतु प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे रुग्णालये वेळेत सुरू झाली नाहीत. प्रशासनास यापुढेही सर्व मदत केली जाईल. परंतु त्यांनी एकमेकांमधील मतभेद दूर करून चांगले काम केले पाहिजे. -सूरज पाटील, नगरसेवक
महापालिकेच्या विशेष महासभेत फक्त चर्चेचे गुऱ्हाळ
By admin | Updated: September 15, 2015 23:27 IST