नवी मुंबई : माथाडी कामगारांना घरासाठी सिडकोने वितरीत केलेल्या जागेवर झालेले अतिक्रमण अखेर सिडकोने हटवले आहे. दोन घरांच्या जागेवर धार्मिकस्थळ बांधून संबंधितांनी माथाडी कामगारांना घरांपासून वंचित ठेवले होते.कोपरखैरणे सेक्टर १ येथे हा प्रकार घडला होता. त्या ठिकाणचे ओटा क्रमांक ५३ व ५४ हे माथाडी कामगार शैलेश भोसले व भिवा उंबरकर यांना सिडकोने घरासाठी वितरीत केले होते. परंतु घरासाठी जागा मिळून दोन वर्षांचा कालावधी उलटूनही ते त्या ठिकाणी घर बांधू शकले नव्हते. सिडकोने वितरीत केलेल्या या भूखंडावर पूर्वीच्या एका झाडाखालीच रातोरात मंदिर उभारले गेले होते. हा प्रकार माथाडींची घरे हडप करण्याच्या उद्देशाने होत असल्याचे लक्षात येताच सदर अनधिकृत बांधकाम पाडावे, अशी मागणी माथाडी संघटनेनेही सिडकोकडे केली होती. त्यानंतरही सिडको प्रशासन दखल घेत नसल्याने भोसले व उंबरकर हे दोघे सातत्याने सिडको कार्यालयात जाऊन चपला झिजवत होते. परंतु अनधिकृत मंदिर उभारणाऱ्यांकडून धार्मिक तणाव निर्माण केला जात असल्याने अद्यापर्यंत त्यावर कारवाई झाली नव्हती. महिन्यावर महिने उलटत असल्याने दोन्ही माथाडी कामगारांच्या कुटुंबांना घराची जागा गमावण्याची भीती सतावत होती. नागरिकांच्या घराची जागा बळकावून त्यावर धार्मिकस्थळ बांधण्याच्या प्रकाराचा त्यांच्याकडून तीव्र संतापही व्यक्त केला जात होता. परंतु दाद मागायची कोणाकडे, असाही प्रश्न त्यांना पडला होता. अखेर या कामगारांनी त्यांची व्यथा मांडली असता ‘लोकमत’ने सिडकोच्या कारभाराचा भांडाफोड केला होता. भूखंडाचे पैसे भरूनही त्यांना ताबा मिळवून देण्यात अडथळा ठरणारे अनधिकृत बांधकाम हटवण्यात सिडकोेचे अधिकारी चालढकल करीत होते. अखेर सिडकोने त्या ठिकाणच्या अनधिकृत धार्मिकस्थळांवर कारवाई करून माथाडींच्या घरातला अडथळा दूर केला आहे. परंतु सिडकोच्या कारवाईनंतर शैलेश भोसले व भिवा उंबरकर हे दोघे माथाडी कामगार जागेच्या पाहणीसाठी गेले असता, सिडकोच्या कारवाईमुळे दुखावलेल्यांनी त्यांच्यावर राग व्यक्त केला. सदर ठिकाणी एक झाड असून, ते जुने असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)अनधिकृत मंदिरावर कारवाईनंतर या झाडावर कारवाई होऊ देणार नसल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. यामुळे भविष्यातही घराच्या बांधकामात अडथळा होण्याची भीती दोन्ही माथाडी कामगारांनी व्यक्त केली आहे.
माथाडींची जागा झाली मोकळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2016 00:59 IST