पनवेल : पालिकेचे काही अधिकारी नगरसेवकांना जुमानत नाहीत. महासभेत विचारलेल्या प्रश्नांबाबत विचारले असता, अधिकारी म्हणतात, बैठकीत काय झाले, याबाबतीत मला माहिती नाही, अशी तक्रार नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी पनवेल महापालिकेच्या ऑनलाईन सभेत केली. शुक्रवारी झालेल्या ऑनलाइन महासभेत हा विषय उपस्थित झाल्यावर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी ही बाब अत्यंत चुकीची असल्याचे कबुली देत संबंधितांना जाब विचारला जाईल, असे आश्वासन दिले. प्रकाश बिनेदार यांनी पनवेल पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता विलास चव्हाण यांना २९ गावांच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन, नवीन पनवेल येथील सिडको वसाहतीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. बैठकीत वेळ जाईल, म्हणून तुम्ही नंतर उत्तरे दिली तरी चालतील, असे सांगितले होते. बिनेदार यांनी प्रश्नाबाबत विचारणा केली असता, महासभेत काय झाले, याबाबतीत कल्पना नाही, असे उत्तर चव्हाण यांनी दिल्यामुळे हा प्रकार बिनेदार यांनी उपस्थित केला.शेकाप नगरसेवक गोपाळ भगत यांनी महापालिका क्षेत्रात प्लास्टीक पिशव्यांवर ५ हजार रुपये दंड असताना ५०० रुपयांची पावती देऊन अधिकारी ५ हजार रुपये गोळा करीत असल्याची तक्रार केली. महापालिकेची प्रतिमा खराब करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सांगा, असे आवाहन केले. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले. सफाई कर्मचाऱ्यांचा सत्काराचा पडला विसर पनवेल महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षी स्वच्छ भारत अभियानात काम करणाऱ्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. लेखाधिकाऱ्यांपासून, आरोग्य निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, लिपिकांपर्यंत कर्मचाऱ्यांचे सत्कार करून महापालिकेला स्वच्छ भारत अभियानात चांगली कामगिरी करण्यात आली. मात्र, या सत्कारांमध्ये एकाही स्वच्छतादूतांचा समावेश नव्हता. प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून दुर्गंधीत झाडू मारणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा सत्कार करण्याचा विसर महापालिकेला पडला की काय, अशी चर्चा महासभेत सुरू होती.सबलीकरणासाठी उपक्रम महिलांना आर्थिक, मानसिक, सामाजिकदृष्ट्या सबलीकरण करण्यासाठी महिला बाल कल्याण सभापती मोनिका महानवर विविध उपक्रम राबविणार आहेत. याकरिता सभापती यांनी महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.
नगरसेवकांना जुमानेनात काही अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 01:06 IST