नवी मुंबई : सिडकोच्या नैना योजनेला खालापूरवासीयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार, शहराचा स्मार्ट विकास करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी ३५५0 हेक्टर जमीन उपलब्ध करण्यात येणार आहे. नैना योजनेच्या धर्तीवर शहराचा स्मार्ट विकास करण्यात येणार आहे. पुढच्या आठवड्यात मुंबईत होणाऱ्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली जाणार आहे.नैना क्षेत्राचा विकास टप्प्याटप्प्याने करण्याची सिडकोची योजना आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. सिडकोने तयार केलेल्या नैना योजनेंतर्गत भूधारकाने एकूण जमिनीपैकी ४0 टक्के जमीन पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सिडकोला द्यायची आहे, तर उर्वरित ६0 टक्के जमिनीचा स्वत: विकास करायचा आहे. सिडकोच्या या योजनेला अनेक विभागांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नैनाच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश असणाऱ्या खालापूर शहरातील अनेक भूधारकांनी स्वेच्छेने जमीन देण्यास तयारी दर्शविली आहे. त्यानुसार, ११ गावांचे एकत्रित प्रतिनिधित्व करणाऱ्या खालापूर नगरपंचायत, कलोटे मोकाशी ग्रामपंचायत आणि नादोडे ग्रामपंचायत यांनी एकूण ३५५0 हेक्टर जमिनीच्या लँड पुलिंगला स्वेच्छेने पुढाकार घेतला आहे. खालापूर स्मार्ट सिटीच्या नियोजनासाठी रायगड जिल्ह्यातील खालापूर, महाड, शिरवली, निंबोडे, वडवे, नादोडे, निगडोली, कलोटे मोकाशी, कलोटे रयाती, विणेगाव आणि कंद्रोली टर्फ या प्रमुख गावांतील सहभागी भूमालकांची खालापूर विशेष हेतू वहन कंपनीची (एस.पी.व्ही.- स्पेशल पर्पज व्हेइकल)स्थापना करण्यात येणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट सिटी प्रकल्पाचे नियोजन केले जाणार आहे.या प्रकल्पासाठी एकूण ७९0९ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. यात खालापूर विशेष हेतू वहन कंपनीतर्फे विकसित करण्यात येणाऱ्या अंतर्गत पायाभूत सुविधांचा खर्च ३२८७ कोटी इतका आहे, तर सिडकोच्या माध्यमातून शहरी व इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ४६२२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पुढच्या आठवड्यात मुंबईत होणाऱ्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात नैना प्रकल्पातील विकासकांबरोबर सिडको दहा सामंजस्य करार करणार आहे.
खालापूरही होणार स्मार्ट
By admin | Updated: February 11, 2016 02:50 IST