- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : शहरात कोरोनाप्रमाणेच इतरही संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वर्षानुवर्षे आढळत आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालय नसल्याने वाशीतील प्रथमसंदर्भ रुग्णालयातच उपचार घेतले जातात. मात्र भविष्यात कोरोनासारख्या इतर संसर्ग आजारांचा धोका असल्याने कायमस्वरूपी संसर्गजन्य रुग्णालयाची आवश्यकता भासत आहे.सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने जगभरात थैमान घातले आहे. नवी मुंबईत त्याचा प्रभाव अधिक प्रमाणात दिसून आला आहे. परिणामी ५० हजार जणांहून अधिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यात १ हजार २८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी पालिकेने वेळीच हालचाली करत उभारलेल्या केंद्रांमुळे मागील एक महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. मात्र भविष्यात इतर संसर्गजन्य आजारांचा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी स्वाईन फ्ल्यू, कुष्ठरोग, प्लेग अशा आजारांच्या लाटा येऊन गेलेल्या आहेत. तर हिवताप, कांजण्या, क्षयगोय या संसर्गजन आजाराचे रुग्ण अद्यापही काही प्रमाणात आहेत. सुदैवाने त्यात मृत्युदर गंभीर नसल्याने वाशीच्या प्रथमसंदर्भ रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार केले जातात. मात्र कोरोनापासून मिळालेल्या धड्यामुळे भविष्यात स्वतंत्र रुग्णालयाची आवश्यकता भासत आहे.सध्या मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात संसर्गजन्य आजारांवर उपचारांची स्वतंत्र यंत्रणा आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई पालिके शहरात संसर्गजन्य रुग्णालय उभारण्यासाठी पाऊल उचलणे काळाची गरज बनले आहे. कीटकजन्य रोग, हवेद्वारे पसरणारे रोग व पाण्याद्वारे पसरणारे रोग अशा तीन वर्गात संसर्गजन्य आजारांचे वर्गीकरण होते. शहरात दाटीची लोकसंख्या असलेल्या भागात या तीनही मार्गाने संसर्ग पसरल्यास आरोग्याची आणीबाणी उद्भवू शकते.
सीबीडीचा भूखंड उपयुक्तप्रशासनाने स्वतंत्र संसर्गजन्य रुग्णालय उभारायचे ठरवल्यास नागरी लोकवस्तीबाहेर सीबीडी सेक्टर ८ येथे पालिकेच्या मालकीचा भूखंड उपयुक्त ठरू शकतो. हा भूखंड क्षयरोग केंद्रासाठी मिळाला असून अद्याप त्याचा वापर झालेला नाही. अथवा पालिकेचीच वापरात नसलेली एखादी वास्तू असे रुग्णालय उभारणीसाठी उपयोगी ठरू शकते.