अलिबाग : देशभरातील महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्ष आणि आभाळमाया सामाजिक शैक्षणिक संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन सोमवारी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधातील धार ठिकठिकाणी अधिक तीव्र होताना दिसत आहे. महिलांविषयी कायद्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी, महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी, खटल्यांची कार्यवाही जलदगतीने करण्यात यावी, विशेष न्यायालयाची व्यवस्था करावी, महिला अत्याचाराच्या कायद्याबाबत जागृती होण्यासाठी विशेष कार्यशाळा, चर्चासत्राचे आयोजन करावे, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे संघटन करु न महिला अत्याचार प्रतिबंधक समिती स्थापन करावी, लज्जा, दहशत, बदनामी, भीतीमुळे आलेल्या पत्रांची दखल घ्यावी, विविध शाळा, महाविद्यालये, कंपनी, कारखान्यांमध्ये कागदावर अस्तित्वात असलेल्या महिला अत्याचार समित्या सक्षम कराव्यात, शाळा, महाविद्यालयांमध्ये मूल्य शिक्षण देण्यात यावे, अशा विविध मागण्यांचा समावेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करु न मूक मोर्चाला सुरु वात झाली. मोर्चामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख डॉ. संगीता चित्रकोटी, संतोष हिरवे, रघुनंदन मोहिते, वंदना पाटील, हेमांगी बांगल, सायली चित्रकोटी, नामदेव कटरे, भगवान ढेबे, सुभाष पाटील, मधुकर येळे यांच्यासह अन्य मान्यवर सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
महिला अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा
By admin | Updated: August 9, 2016 02:28 IST