उल्हासनगर : अवैध धंद्याच्या तक्रारीतून शिवसेना शाखाप्रमुखासह मुलावर जीवघेणा हल्ला तर एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न हातभट्टीवाल्याकडून झाला आहे. या प्रकाराने शिवसैनिकांनी आक्रमक होऊन हातभट्टीच्या धंद्यावर कारवाई करण्याची मागणी करीत रस्त्यावर उतरण्याचा इशारा पोलिसाला दिला आहे.उल्हासनगर कॅम्प नं-१, हनुमाननगर टेकडी भागातील अवैध हातभट्टीची तक्रार शिवसेना शाखाप्रमुख बाबू कुलाल यांनी पोलिसाकडे केली होती. तक्रारीचा राग हातभट्टी चालविणाऱ्या शिंदे कुटुंबाला येऊन त्यांनी बाबू कुलाल यांच्यासह मुलगा संतोष यांच्यावर तलवारीने हल्ला केला. हल्ल्यात बाबू कुलाल गंभीर जखमी झाले असून संतोष यांच्या हाताची बोटे कापली आहेत.टपरीवजा दुकान चालविणाऱ्या गुप्तावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न शिंदे कुटुंबाने केला आहे. शिवसेना शाखाप्रमुखावरील हल्ला व जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिंदे कुटुंबातील ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकाराने शहरातील अवैध धंद्याचे साम्राज्य उघड झाले असून अवैध धंदे बंद करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी पोलीस उपायुक्ताकडे केली आहे.शहरातील बहुतांश झोपडपट्टी भागात रासरोसपणे हातभट्टी दारूची विक्री होत असून स्थानिक पोलीस बघ्याची भूमिका वटवत असल्याची टीका शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केली आहे. शहाड गावठाण, गुलशननगर, सी ब्लॉक, करोतियानगर, भय्यासाहेब व रमाबाई आंबेडकरनगर, डम्पिंग ग्राउंड परिसर, म्हारळगाव, सुभाषनगर, खेमाणी, सम्राट अशोकनगर, अयोध्यानगर, नागसेननगर, भरतनगर, अचानकनगर, प्रेमनगर टेकडी, गायकवाडपाडा, कैलास कॉलनी, दहाचाळ, महात्मा फुलेनगर, मद्रासीपाडा येथे खुलेआम हातभट्टीची दारू मिळते. (प्रतिनिधी)
कुलालांवरील हल्ल्याने शिवसैनिक आक्रमक
By admin | Updated: September 14, 2015 03:55 IST