हितेन नाईक, पालघरबिगर आदिवासींवर अन्याय करणारा कायदा रद्द करावा व तलाठी भरती प्रक्रियेला स्थगिती यावी, यासाठी बिगर आदिवासी हक्क परिषदेने मोर्चा काढूनही पालघरमध्ये रविवारी तलाठी भरती निवड परीक्षा घेण्यात आल्याने हक्क परिषदेने शासनाविरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. हा मोर्चा अडवून पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले.राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय स्तरावरील ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, कृषी सहायक, आरोग्य कर्मचारी इ. महत्त्वाची वर्ग ३ व ४ मधील समकक्ष पदे स्थानिकांसाठीच आरक्षित करणारा अध्यादेश राज्यपालांनी ९ जून २०१४ रोजी मंजूर केला आहे. या अध्यादेशामुळे पालघर जिल्ह्यातील बिगर आदिवासींवर संकट आले आहे. ७ सप्टेंबरला बिगर आदिवासी हक्क परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करून बिगर आदिवासी समाजाला दिलेले आरक्षण कायम राखण्याची तसेच तलाठी भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु, शासनाने रविवारी पालघरमध्ये तलाठी भरती निवड परीक्षा जाहीर केल्याने बिगर आदिवासी समाजामधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ही भरती उधळून लावण्यात येणार असल्याचे मेसेज व्हॉट्सअॅप वरून पसरत असल्याने चौदा परीक्षा केंद्रांवर २० अधिकारी, २०० पोलीस इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीसांची तैनात केली होती.
...तरीही झाली निवड परीक्षा
By admin | Updated: September 14, 2015 03:49 IST