सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईनवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी मैदानाचे भाडे भरताना आयोजक मंडळांच्या खिशाला कात्री लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाडेदरात चौपट वाढ झाली आहे. याबाबत आयोजकांकडून प्रशासनाप्रती नाराजी व्यक्त होत आहे.दोन दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. उत्साहात साजरा होणाऱ्या या उत्सवाची तरुण-तरुणींसह प्रौढांनाही उत्सुकता लागली आहे. मात्र उत्सवाची तयारी करीत असतानाच मंडळांना मात्र आर्थिक प्रश्न पडला आहे. यंदा प्रथमच मोकळ्या मैदानांच्या भाड्याच्या रकमेत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवासाठी मैदान मिळवण्याकरिता मंडळांना १२ ते ३२ हजार रुपयांपर्यंतचे भाडे भरावे लागणार आहे. त्यामुळे मंडळांच्या खिशाला कात्री बसणार आहे. परिणामी वर्गणीच्या स्वरूपात परिसरातील व्यावसायिकांना मंडळांचा त्रास होण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही. न्यायालयाच्या निर्देशानुसार यंदा प्रथमच रस्त्यावर उत्सव साजरा करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे आयोजक मंडळांनी लगतच्या मैदानात धाव घेतली आहे. सध्या त्यांच्यापुढे उत्सवासाठी मैदान हाच एकमेव पर्याय आहे. याचाच फायदा संबंधित प्रशासनाकडून घेतला जात आहे. मैदाने भाड्याने मिळवण्यासाठी सिडको व पालिका प्रशासनाकडे अनेक मंडळांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार मैदाणाचे भाडे दरपत्रक सदर मंडळांना देण्यात आले आहे. त्यामधील रकमेचा आकडा पाहूनच आयोजकांना घाम फुटला आहे. भाड्याच्या स्वरूपात १२ ते ३२ हजार रुपये भरल्यानंतरच मंडळांना मैदानावर ताबा मिळणार आहे. यामुळे मंडळाच्या खिशाला कात्री लागणार आहे. गतवर्षी ३०० ते ५ हजार रुपये भाडे भरून नवरात्रोत्सव साजरा केलेल्या मंडळांना हा आर्थिक फटका आहे.रस्त्यावर नवरात्रोत्सव साजरा करताना मंडळांना परवानगीसाठी सुमारे ३०० ते ५०० रुपये खर्च यायचा. तर पालिकेच्या अथवा सिडकोच्या मैदानावर २ ते ५ हजार रुपये भाडे आकारले जात होते. त्यामुळे अनेक मंडळे रस्त्यावरच नवरात्रोत्सव साजरा करायची. यंदा रस्त्यावर उत्सवाला पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे मंडळांपुढे मैदानांचा एकमेव पर्याय आहे. अशातच मैदानाच्या भाड्यात चौपट वाढ करून प्रशासनाने मंडळांची गळचेपी केल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. एकीकडे पोलीस उत्सवांसाठी मैदानांचा पर्याय सुचवत असताना, प्रशासन मैदानासाठी भरमसाठ भाडे आकारत आहे. त्यामुळे मंडळांनी उत्सव करायचे की नाही, हे देखील प्रशासनाने स्पष्ट करावे असेही त्यांचे म्हणणे आहे. तर सर्व परवानग्या घेऊन उत्सव साजरा करणाऱ्यांनाच हा भुर्दंड असून, विनापरवाना कार्यक्रम करणाऱ्या मंडळांकडे मात्र प्रशासनाची डोळेझाक होत असल्याचाही संताप व्यक्त होत आहे.
नवरात्रोत्सव मंडळांच्या खिशाला कात्री
By admin | Updated: October 12, 2015 04:56 IST