लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटबाहेरील रिक्षा व टॅक्सी स्टँड जुगार खेळणाऱ्यांचा व गर्दुल्ल्यांचा अड्डा झाला आहे. दिवसभर कामगार, रिक्षा चालकांसह इतर नागरिक गांजा ओढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वारंवार तक्रारी केल्यानंतरही पोलीस, वाहतूक विभाग व आरटीओ प्रशासन कारवाई करत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी सिडकोने कांदा मार्केटच्या बाहेर रिक्षा व टॅक्सी स्टँड तयार केले आहे. परंतु या स्टँडचा वापर अवैध व्यवसायासाठी होवू लागला आहे. यापूर्वी येथे गोऱ्या नावाची व्यक्ती गांजा विक्री करत होती. अवैध व्यवसायासाठी रिक्षा चालकांचीही मदत घेतली जात होती. रिक्षा चालकांनाच विक्रेते बनविले होते व अनेक चालकांना गांजा ओढण्याचे व्यसन लावले होते. पोलिसांच्या धाडसत्रामुळे येथील गांजा विक्री थांबली असली तरी रिक्षा स्टँडच्या मोकळ्या जागेमध्ये दिवसभर गांजा ओढणाऱ्यांची मैफल सुरू असते. यामध्ये रिक्षा चालकांचाही समावेश आहे. याशिवाय येथील एक कोपऱ्यामध्ये पत्त्यांचा जुगार सुरू असतो. येथेच बसून अनेक जण मद्यपान करत असतात. अवैध व्यवसायांमुळे कोणीही प्रवासी स्टँडमध्ये जात नाही. अनेक रिक्षा चालक फक्त वेळ घालविण्यासाठीच येथे येत असल्याचे दिसून येत आहे. चुकीचे काम करणाऱ्यांमुळे प्रामाणिक रिक्षा चालकांचीही नाहक बदनामी होवू लागली आहे. येथे रीतसर व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांवरही संशयाच्या नजरेने बघितले जात आहे. या स्टँडपासून काही अंतरावर वाहतूक पोलीस चौकी आहे. सहायक पोलीस आयुक्त, उपआयुक्त, गुन्हे शाखा, एपीएमसी पोलीस स्टेशनही याच परिसरामध्ये आहे. आरटीओ कार्यालयही या स्टँडपासून थोड्या अंतरावर आहे. परंतु कोणीही या समस्येकडे गांभीर्याने पाहात नाही. येथील अवैध गोष्टी बंद करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.
रिक्षा स्टँड बनला गर्दुल्ल्यांचा अड्डा
By admin | Updated: May 24, 2017 01:44 IST