कळंबोली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी विद्युत रोषणाई होत असताना कळंबोली सर्कल मात्र अंधारात होते. या ठिकाणचे दोनही हायमास्ट गेल्या दोन महिन्यापासून बंद होते. मात्र लोकमतमधील प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल घेत सिडकोने दोनही हायमास्ट बुधवारी दुरूस्त केले. कळंबोली सर्कल येथे पनवेल-सायन, मुंबई- पुणे, जेएनपीटी, द्रुतगती त्याचबरोबर मुंब्रा महामार्ग एकत्र येतात. हे अतिशय महत्त्वाचे वाहतूक बीट असून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. चार वर्षापूर्वी या ठिकाणी सिडकोने दोन हायमास्ट दिवे बसवले. एक मुंब्रा महामार्ग आणि एक जेएनपीटीकडे जाणाऱ्या महामार्गाच्या प्रवेशव्दारावर हे दिवे लावले होते. त्याची दुरूस्ती देखभालीकडे सिडको सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने कधी दिवे बंद कधी चालू असे चित्र असते. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथे वाहतूक नियमन करण्यास अडथळे निर्माण होत होते. त्यानुसार लोकमतने बुधवारी वृत्त प्रसिध्द केले. या वृत्ताची दखल घेत सिडकोने सकाळीच हायमास्टची दुरूस्ती केली.(वार्ताहर)
सर्कलच्या हायमास्टची दुरुस्ती
By admin | Updated: September 17, 2015 00:03 IST