अलिबाग : रायगड पोलीस मुख्यालयात ११ ते १३ जुलै रोजी झालेल्या कोकण परिक्षेत्रीय चौदाव्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात वेगवेगळ्या सहा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात रायगड पोलीस दलाने सांघिक विजेतेपद पटकावले आहे. रायगड जिल्हा व सत्र न्यायाधीश मुकुंद गो.सेवलीकर यांच्या हस्ते बुधवारी संध्याकाळी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी रायगडचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक मनोजकुमार म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते.कोकण परिक्षेत्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे ग्रामीण आणि पालघर या पाच जिल्हा पोलीस दलातील १२ अधिकारी व ७० पोलीस कर्मचारी मेळाव्यात सहभागी झाले होते. गुन्ह्याचा तपास बिनचूक व्हावा याकरिता न्याय सहाय्यक वैज्ञानिक पडताळणी, गुन्हा व्हिडीओग्राफी व फोटोग्राफी, डॉगस्क्वॉड, घातपातविरोधी तपासणी, सायबर क्राइम, सीसीटीएनएस आदी एकूण सहा विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. १८ जुलै रोजी पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात रायगड पोलीस दल संघ कोकण परिक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
मेळाव्यात रायगड पोलीस अव्वल
By admin | Updated: July 15, 2016 01:37 IST