माथेरान : माथेरानच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि येथील पर्यटन व्यवसाय अधिकाधिक वृद्धिंगत होण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा ५० कोटी १० लाख ९६ हजार २४१ रुपयांचा अर्थसंकल्प विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी नगरपरिषदेच्या सभागृहात सादर केला.हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या घरदुरुस्तीसाठी ५ लाख रुपये, पर्यटन महोत्सवासाठी १० लाख, अॅम्युझमेंट पार्ककरिता १५ लाख, उद्याने अभिनव बेंचेस १० लाख, अद्ययावत तंत्रज्ञान म्युझिक सिस्टीम ५ लाख, कारंजे विकसित करणे, गार्डन व झाडे लँड स्केटिंगकरिता १० लाख, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, संत रोहिदास जयंती आणि संकीर्णकरिता प्रत्येकी ३ लाख रु पयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव केलेला आहे. एम.पी.एस.सी./यू.पी.एस.सी. इतर स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शन यासाठी ५ लाखांची तरतूद, व्हर्च्युअल क्लास रूमसाठी २ लाख रुपये, ई-लर्निंग स्कूल, ज्ञानरचना पाठशाळा, शिक्षक प्रशिक्षण, शिल्लक गणवेष, झरे दर्शक फलक त्याचप्रमाणे महत्त्वाचे पॉर्इंट्स विकसित करणे आदींसाठी नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पात तरतूदकेली आहे. माथेरानच्या नगरपरिषदेकडे सध्या १० कोटी रु पये शिल्लक आहेत. नगरपरिषदेचे अपेक्षित उत्पन्न १२ कोटी ९६ लाख ९४१ रुपये शिलकी अंदाजपत्रकात आहे. दरवर्षी प्रवासी कर, वाहन कर तसेच अन्य भाडे माध्यमातून ४ कोटी ८० लाख रुपये उत्पन्न मिळते. ५० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करताना शासनाच्या वेगवेगळ्या अनुदानातून हा खर्च करण्याची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. या वेळी मुख्याधिकारी सागर घोलप यांनीही माथेरानच्या विकासाच्या अर्थसंकल्पात सकारात्मक भूमिका घेतली.
माथेरानच्या पर्यटनवृद्धीसाठी तरतूद
By admin | Updated: February 25, 2017 03:16 IST