विजय वडेट्टीवार यांची माहिती : ब्रह्मपुरीत सर्वस्तरीय बैठक ब्रह्मपुरी : जानेवारी २०१६ मध्ये होणाऱ्या ब्रह्मपुरी महोत्सवासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी गोसीखुर्द विश्रामगृहात सर्वस्तरीय बैठक घेऊन कार्यक्रमाची माहिती विषद केली व जय्यत तयारी सुरू असल्याचे सांगितले. तीन दिवसीय ब्रह्मपुरी महोत्सवाची माहिती देताना आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले, पहिल्या दिवशी ब्रह्मपुरी स्वच्छता अभियान राबविण्याच्या दृष्टीने नगरपालिका, विद्यार्थी, समाज संस्था व संपूर्ण राजकीय नागरिकांचा सहभाग राहणार असून स्वच्छतेचा महत्त्व जनतेला पटवून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्याच दिवशी ब्रह्मपुरी महोत्सव दिंडीचे आयोजन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी व अन्य महापुरुषांची वेशभूषा धारण करुन दिंडी काढण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी चर्चासत्र, आरोग्य शिबिर, महिला विषय जागृती व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केल्या जातील. समारोपीय दिवशी प्रख्यात नायक व नायिका आणून त्यांच्याद्वारे शेतकऱ्यांचे चर्चासत्र घडवून आणणार आहे. ब्रह्मपुरी महोत्सवाच्या निमित्ताने स्मरणिका काढून प्रकाशन करण्यात येईल तसेच महोत्सवात विविध क्षेत्रात नामवंतांचा सत्कार, प्रत्येक कार्यालयावर विद्युत रोषणाई व अन्य उपक्रमासाठी समित्या तयार केल्या जातील, याविषयीची माहिती आमदार वडेट्टीवार यांनी याप्रसंगी दिली. बैठकीत नगराध्यक्ष रिता उराडे, अॅड. गोविंद भेंडारकर, दामोधर मिसार, प्रभाकर सेलोकर, अशोक रामटेके यांनीही विचार व्यक्त केले. बैठकीला नेताजी मेश्राम, मुख्याधिकारी मंगेश खवले, नगरसेविकास यास्मीन लाखानी, डॉ. हेमलता नंदूरकर, लोकमत सखी मंचच्या सहसंयोजिका साधना केळझरकर, प्रीती कऱ्हाडे, अल्का खोकले, सांझ विहार ग्रुप, सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी, अधिकारी व सर्वच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
महोत्सवासाठी जय्यत तयारी
By admin | Updated: December 8, 2015 00:53 IST