नवी मुंबई : गरजेपोटी बांधलेली घरे, नोकरी, शिक्षण व इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रकल्पग्रस्त तरुण १४ मार्चपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी ९५ गावांमधील हजारो प्रकल्पग्रस्त उपस्थित राहणार आहेत. जवळपास पाच दशकांपासून होत असलेल्या अन्यायाविरोधात शक्तिप्रदर्शन करून सरकारला ताकद दाखविण्याचा निर्धार केला असून शासन प्रशासनासह राजकीय पक्षांचे लक्षही या मोर्चाकडे लागले आहे. आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून एक महिन्यापासून नवी मुंबईमधील प्रत्येक गावामध्ये आंदोलनाविषयी जनजागृती सुरू केली आहे. सर्व प्रथम गावबैठका घेवून तरुणांना आंदोलनाची माहिती देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात जाहीर सभा घेवून एक लढा हक्कासाठीची घोषणा देण्यात आली. रोज सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक भूमिपुत्रापर्यंत आंदोलनामागील भूमिका पोहचविण्यात आली. नेरूळ गावामध्ये आयोजित केलेल्या बैठकीला पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांनी उपस्थिती दर्शविली व तेव्हापासून प्रत्येक गावाच्या बैठकीमध्ये गर्दीचा नवीन विक्रम प्रस्थापित होत गेला. आता नाही तर कधीच नाहीचा नारा सुरू झाला. तरुणाईच्या प्रयत्नांना यश येवू लागले. एक महिना फेसबुक, व्हॉट्सअॅप व प्रत्यक्ष भेटीदरम्यानही फक्त व फक्त आंदोलनाची चर्चा सुरू झाली. युथ फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्येक गाव अक्षरश: पिंजून काढले आहे. यामुळे १४ तारखेला होणारा मोर्चा व उपोषणाला विक्रमी प्रतिसाद मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनीही निर्धार मोर्चाच्या दरम्यान बेमुदत उपोषणामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले असल्यामुळे तरुणाईचे मनोबल अजून वाढले आहे. नवी मुंबईमधील प्रत्येक गावामध्ये होळी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येते. होळीच्या निमित्ताने प्रत्येक गावामध्ये मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. करावे गावामध्ये शनिवारी आयोजित केलेल्या सभेलाही मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. होळी दिवशी नेरूळ, वाशी व इतर सर्वच गावांमध्ये रांगोळीच्या माध्यमातून शिव शंभो मित्र मंडळाच्या सेक्टर २० मध्येही महारांगोळी काढून आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष गणेश ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनीही याविषयी जनजागृती करण्यात आली. वाशी गावामधील तरुणांनी पारंपरिक वेशामध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित करून आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)
सरकारविरोधात भूमिपुत्र तरुणांचे आज शक्तिप्रदर्शन
By admin | Updated: March 14, 2017 02:07 IST