वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : रायगड जिल्ह्यातील पहिल्या पनवेल महानगरपालिकेची निवडणूक बुधवारी २४ मे रोजी पार पडणार आहे. २० प्रभागातील ७८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे बुधवार हा मतदारराजाचा वार ठरणार आहे. महापालिकेत क्षेत्रात ४ लाख २५ हजार मतदार आहेत. मतदारराजा मतदाराच्या रूपाने आपला कौल देणार आहे. ७८ जागांसाठी ४१८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपा-आरपीआय युती, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी, शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना युती व अपक्ष अशी चौरंगी लढत या निवडणुकीत पाहावयास मिळणार आहे. ५७० केंद्रांवर अडीच हजारांवर पोलीस बंदोबस्त आहे, तर ४ हजारांहून अधिक निवडणूक कर्मचारी तैनात आहेत. त्यामुळे सर्वच शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी महाराष्ट्र शासन, उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडील शासन परिपत्रकानुसार सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आलेली आहे. याची सर्व शासकीय व खासगी आस्थापना, दुकाने व इतर आस्थापना,निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्र म व इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनांनी नोंद घ्यावी. काही अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी केवळ २ ते ३ तासांची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत आस्थापनांनी पनवेल महानगरपालिका यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २ ते ३ तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांना देण्यात आल्याचे पनवेल महापालिका आयुक्तयांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.गैरव्यवहार रोखण्यासाठी भरारी पथकगैरप्रकारांकडे लक्ष ठेवण्यासाठी आयोगाने ३४ पथके तैनात केली असून, त्यात २४ भरारी पथके व १२ सर्वेक्षण पथकांचा समावेश आहे. ही पथके तीन शिफ्टमध्ये काम करीत आहेत. या व्यतिरिक्त पोलिसांची पथके, तसेच महापालिकेचे काही कर्मचारीसुद्धा गैरव्यवहारांकडे लक्ष ठेवून आहेत. पोलिसांकडून संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात येत असून, निवडणूक यंत्रणेमधील कर्मचारी मंगळवारी मतदार यंत्रासहित आपापल्या बुथवरती पोहोचले आहेत. ही निवडणूक शांततेने पार पडण्यासाठी शासन यंत्रणा सज्ज झाली आहे.सेल्फी काढा बक्षीस मिळवापनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान करताना कोणतीही अडचण येणार नाही, अशी खात्री देत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी केले आहे. अधिक सुलभतेसाठी सकाळीच मतदान करा, असेही त्यांनी सांगितले आहे. यंदा प्रथमच मतदारांसाठी सेल्फी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे मतदानाचा टक्का वाढेल, असा विश्वास आयुक्त निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे. ११० शाळांमध्ये असलेल्या ५७० मतदान केंद्रांवर ४००० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रचारादरम्यान घडलेल्या अनुचित प्रकारामुळे पोलीस प्रशासनसुद्धा सजग झाले आहे. मतदान केंद्रावर पाणी आणि सावलीची व्यवस्था करण्यात आली असून, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष मदत पुरवण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे.मतदान केंद्र नकाशासहित महापालिकेच्या व्होटर सर्च अॅपमध्ये पाहायला मिळणार आहे. ९७६९० १२०१२ या क्रमांकावर पाठवा सेल्फीमतदान करून शाई लावलेल्या बोटासह फोटो मतदार यादीतील नावासह वरील व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपूर्ण कुटुंबासह फोटो पाठविणाऱ्या मतदारांना स्पर्धेच्या विजेत्यांमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. फोटोची छाननी केल्यांनतर प्रत्येक प्रभागातून पाच याप्रमाणे सर्वोत्तम १०० विजेत्यांना करात २५ टक्के सूट मिळणार आहे. ३० मे रोजी या स्पर्धेच्या विजेत्यांची नावे जाहीर होणार आहेत.हॉटेलमधील बिलावर सूट २४ ते २६ मेपर्यंत मतदारांना पनवेलमधील हॉटेल असो. शी जोडलेल्या हॉटेलमधील बिलावर २५ टक्के सूट मिळणार आहे .
पनवेलमध्ये आज मतदान
By admin | Updated: May 24, 2017 01:34 IST