कर्जत : महिला सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत, त्याही पुरुषापेक्षा कमी नाहीत, त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी त्या समर्थपणे सांभाळू शकतात, यासाठी मंगळवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्जत पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवसभर काम पाहिले आणि ते समर्थपणे सांभाळले सुध्दा. आज जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. त्याचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला अधिकारी व अंमलदार हे प्रमुख म्हणून काम करतील असे आदेश रायगड पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी काढले. त्यानुसार कर्जत पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून महिला पोलीस नाईक अंकिता चिंबूळकर या काम पाहत होत्या. त्याचबरोबर संगणकावर प्रीतम देशमुख तर वायरलेस सेटवर अशा महत्त्वाच्या ठिकाणी महिला पोलीस कर्मचारी काम करताना दिसत होत्या. रायगड जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथक तयार करण्यात आले आहे. हे दामिनी पथक प्रत्येक पोलीस ठाण्यात कार्यरत राहणार आहे.या कर्जत पथकात महिला पोलीस नाईक अमिता कांबळे व महिला पोलीस नाईक सोनाली घोलप या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (वार्ताहर)
पोलीस ठाण्याचा कारभार महिलांच्या हाती
By admin | Updated: March 9, 2016 03:42 IST