लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: इस्कॉन मंदिर ट्रस्टने खारघरमध्ये उभारलेल्या मंदिरचा लोकार्पण सोहळा नवीन वर्षात दि. ९ ते १५ जानेवारी या सात दिवसांच्या काळात रंगणार असून, त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार असल्याची माहिती शनिवारी आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
इंटर नॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सियसन्स (इस्कॉन) ही एक जागतिक संस्था आहे. भारतासह जगभरात सुमारे ४००० हून अधिक मंदिरे आहेत. इस्कॉनमधील अनुयायी जगभर भगवद्गीता आणि हिंदू धर्म, संस्कृतीचा प्रचार करतात.
मंदिराला १६० कोटींचा खर्च
२०१२ साली खारघरमध्ये सेंट्रल पार्कशेजारी १ एकर जमिनीवर इस्कॉन मंदिराची स्थापना केली. मंदिर परिसरात दोन सहा मजली इमारतीचे बांधकाम अंतिम जवळपास पूर्ण झाले आहे. १६० कोटी रुपयांचा खर्च मंदिर उभारणीस आलेला आहे. एका इमारतीत राधा मदन मोहन, राम, सीता आणि लक्ष्मण आणि हनुमानाची भव्य आणि सुंदर मूर्ती तर एका मजल्यावर प्रभुपाद यांची मूर्ती असणार आहे. तसेच भक्त आणि मंदिर सदस्यांसाठी १०० खोल्यांचे गेस्ट हाऊस आहे. प्रसाद हॉलशिवाय श्रीकृष्णाचे सेवा करणाऱ्या ब्रह्मचारी आश्रम, वानप्रस्थाश्रम, प्रभूपाठ, महिलांसाठी वेगळे आश्रम उभारले आहेत.