नवी मुंबई : डॉक्टरच्या घरी घरफोडी करून तीन महागड्या मूर्ती चोरणाऱ्या तरुणाला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. तो डॉक्टरच्या शेजारीच राहणारा असून व्यसनासाठी पैशांकरिता त्याने मूर्तींची चोरी केली होती. अखेर मंगळवारी रात्री त्याला अटक करण्यात आली.विजय वाल्मिकी (२३) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. घणसोली सेक्टर ६ येथील कारगिल सोसायटीत तो राहणारा आहे. त्याच सोसायटीत राहणाऱ्या डॉ. मार्तंड यांच्या घरी त्याने आठवड्यापूर्वी चोरी केली होती. या प्रकारात डॉ. मार्तंड यांच्या घरातील पितळेच्या व इतर धातूच्या तीन महागड्या मूर्ती चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक प्रदीप तिदर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक निरीक्षक संतोष कोतवाल अधिक तपास करीत होते. तपासादरम्यान हाती लागलेल्या काही पुराव्यावरून विजय याच्यावर पोलिसांचा संशय बळावला होता. शिवाय घटनेपासून तो फरार असल्यामुळे तपास पथक त्याच्या मागावर होते. अखेर मंगळवारी रात्री तो राहत्या घरी येणार असल्याची माहिती कोतवाल यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून विजय वाल्मिकी याला अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडून चोरीच्या तिन्ही मूर्ती जप्त करण्यात आल्या. त्याला व्यसनाची सवय असून तो बेकार आहे. यामुळे व्यसनासाठी पैसे मिळवण्याकरिता चोरीच्या उद्देशाने तो डॉ. मार्तंड यांच्या घरात घुसला होता. परंतु त्या ठिकाणी चोरण्यासाठी त्याला काहीच न सापडल्यामुळे हाती लागलेल्या मूर्ती घेऊन तो पळाला होता. त्याच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
व्यसनासाठी मूर्ती चोरी करणाऱ्यास अटक
By admin | Updated: July 14, 2016 02:14 IST