पनवेल : आधुनिक शहर म्हणून जाहिरात करून सिडकोने नवीन पनवेल खांदा वसाहतीची निर्मिती केली. परंतु सिडकोच्या अनास्थेमुळे आणि दुर्लक्षित धोरणामुळे येथील रहिवाशांना अनेक समस्या आजही भेडसावत आहेत. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी मंगळवार, ८ डिसेंबरला सिडकोच्या नवीन पनवेल कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाने महामोर्चाचे आयोजन केले आहे. नवीन पनवेल येथील तुलसी हाईट इमारतीजवळून सकाळी १० वाजता या मोर्चाला सुरु वात होणार आहे.सिडकोच्या जीर्ण झालेल्या इमारतींच्या पुनर्विकास धोरणात सुधारणा करणे,अपुरा पाणीपुरवठा,सार्वजनिक स्वच्छता, अंतर्गत रस्ते व ड्रेनेज लाइन, सार्वजनिक शौचालय, समाज मंदिर,ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, फेरीवाले हॉकर्स झोनकरिता जागा व लीज वाढवणे, खांदा कॉलनी ते रेल्वे स्टेशनला जाण्याकरिता सायन -पनवेल महामार्गावर ओव्हरब्रिज बांधणे, खांदा कॉलनी शिवाजी चौकात सिग्नल बसविणे, शाळांच्या ताब्यातील सार्वजनिक मैदाने जनतेसाठी खुली करावी, मंदिरांना संरक्षण देणे, झोपडपट्टी पुनर्वसन करणे, राजीव गांधी मैदान विकसित करणे, सीसीटीव्ही बसविणे,पार्किंग व्यवस्था व वाहतूक कोंडीवर उपाययोजना करणे,आदी प्रकारच्या मागण्या शेकापतर्फेकरण्यात आल्या आहेत. मोर्चात जनतेच्या हक्कासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेकापच्या वतीने केले आहे.
समस्यांविरोधात शेकापचा सिडकोवर महामोर्चा
By admin | Updated: December 7, 2015 01:17 IST