- वैभव गायकर, पनवेलनवी मुंबईमधील हॉट डेस्टीनेशन म्हणून खारघर ओळखले जाऊ लागले आहे. या ठिकाणचे प्रकल्प, निसर्गाची जोड, सुनियोजित रस्त्यामुळे प्रत्येकाला खारघरमध्ये राहण्याचा मोह आवरता येत नाही. यामुळेच उच्चवर्गीयांचे शहर म्हणून खारघर शहराची ओळख निर्माण होत असताना पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्याही खारघरमध्ये वाढत आहे. शहराची लोकसंख्या सध्या ३ लाखांच्या घरात आहे. शैक्षणिक केंद्र म्हणून शहर विकसित होत असून देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक खारघरसारख्या शहरामध्ये स्थलांतरित होत आहेत.गतवर्षी आयुक्तालयामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, जवळजवळ ४,५०० नागरिकांनी खारघरमधून पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज केले होते. येथील गोपनीय विभागांकडे आकडेवारी उपलब्ध आहे. यंदा आतापर्यंत ४,३०० नागरिकांनी पासपोर्टसाठी अर्ज भरले असून वर्षभरात हा आकडा ५००० पेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी राहणारे उच्चशिक्षित नागरिक, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींबरोबरच स्वत:ची ओळख व पक्का पत्ता यासाठीही नागरिक पासपोर्ट आवेदन करत असतात. यामधील केवळ १० टक्के पासपोर्टधारकच परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढत असल्याची माहिती उघड झाली आहे. पासपोर्ट काढणाऱ्यांमध्ये ७० टक्के अमराठी नागरिक आहेत. उच्चवर्गीयाची रहदारी, आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प यामुळे शहराची ओळख देशात महत्त्वाच्या शहरापैकी एक म्हणून होत आहे. शहरात एकूण ४० सेक्टर असून यापैकी निम्म्या सेक्टरमध्ये नागरिकांची रहदारी वाढलेली नाही. शिक्षणाचे माहेरघर म्हणून विकसित होणाऱ्या खारघरमध्ये १५ पेक्षा जास्त विद्यालये व महाविद्यालये असून याठिकाणीही अनेक परप्रांतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या या ठिकाणी लोकसंख्या ३ लाखांच्या घरात असली तरी नजीकच्या काळातच हा आकडा ५ लाखांच्या वर जाणार आहे. तसेच आंतराष्ट्रीय विमानतळ , मेट्रो प्रकल्प यामुळे देखील देशभरातून नागरिक या ठिकाणी स्थायिक होतील. सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग यासारखी सहज कनेक्टिव्हिटी असल्यामुळे व्यापारी वर्गाला देखील हे शहर भुरळ घालत आहे
पासपोर्टच्या अर्जदारांमध्ये वाढ
By admin | Updated: October 3, 2015 23:32 IST