नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अतिक्रमणाच्या विरोधात कंबर कसली आहे. त्याअंतर्गत पदपथावरील फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मात्र, फेरीवाल्यांवरील या कारवाईत महापालिकेकडून पक्षपातीपणा केला जात आहे. विनापरवाना फेरीवाल्यांना अभय देत परवानाधारक फेरीवाल्यांनाच लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप नवी मुंबई लेबर युनियनचे अध्यक्ष प्रफुल्ल म्हात्रे यांनी केला आहे. महापालिकेच्या या कारवाईच्या विरोधात २४ जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.शहरातील बहुतांशी पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार महापालिका आयुक्त मुंढे यांनी केला आहे. त्यानुसार २५ डिसेंबरपासून पुन्हा फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे, असे असले तरी ही कारवाई करताना पक्षपातीपणाचे धोरण अवलंबिले जात असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. या कारवाईअंतर्गत पदपथांवरील टेलिफोन बुथ, गटई कामगारांचे स्टॉल्स, ज्युस सेंटर, दूध सेंटर आदींकडे सोईस्करपणे डोळेझाक केली जात आहे. तसेच शहरातील व्यापाऱ्यांनी मार्जिनल स्पेसवरील मोकळ्या जागा विविध विक्रेत्यांना भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. या विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. रेल्वे स्थानकाजवळील किओक्सच्या परिसरात मोठ्याप्रमाणात बेकायदा ठेले थाटले आहेत. वाशी सेक्टर १५ येथील अनधिकृत कपड्यांचा बाजार आजही सुरूच आहे. त्यावर कोणतीही कारवाई होत नाही; परंतु अधिकृत परवाना असलेल्या फेरीवाल्यांवर मात्र कारवाई केली जात आहे. परवानाधारक फेरीवाले मागील २०-२५ वर्षांपासून नियमितपणे शुल्क भरून व्यवसाय करीत आहेत. (प्रतिनिधी)कारवाई दरम्यान चार फेरीवाले जखमीस्टॉल्स किंवा वडापावच्या गाड्या उचलताना तेथील फेरीवाल्यांना काही दुखापत होईल, यासंदर्भात कोणतीही काळजी घेतली जात नाही. या पथकाचे कर्मचारी अगदी अमानुषपणे फेरीवाल्यांच्या गाड्या उलथून लावतात. अशाच एका कारवाईदरम्यान कढईतील उकळते तेल अंगावर पडून चार फेरीवाले जखमी झाल्याची माहिती प्रफुल्ल म्हात्रे यांनी या वेळी दिली.
फेरीवाल्यांवरील कारवाईत पक्षपातीपणा
By admin | Updated: January 12, 2017 06:27 IST