अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र नेमीचंद खंडागळे यास सोमवारी संध्याकाळी त्याच्या कार्यालयातच पाच हजार रुपयांची लाच घेताना सापळा रचून रंगेहाथ पकडले असल्याची माहिती रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक सुनील कलगुटकर यांनी दिली आहे.एमबीबीएस पदवी संपादन करून शासकीय नियमांप्रमाणे ग्रामीण भागात प्रत्यक्ष सेवा देण्याकरिता रायगड जिल्ह्यात कार्यरत एका डॉक्टरांना १३ फेब्रुवारी २०१५ ते ११ फेब्रुवारी २०१६ या कालावधीचे शासकीय नियमाप्रमाणे अनुभव प्रमाणपत्रे देण्याकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र खंडागळे याने त्या नवीन डॉक्टराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत त्या डॉक्टरांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. तक्रारीची खातरजमा करून सापळा रचून नवीन डॉक्टरांकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक बी. आर. दळवी यांच्या पथकाने डॉ. खंडागळे यास रंगेहाथ पकडले.रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी व साहाय्यक जिल्हा वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त असल्याने सोमवारी डॉ. खंडागळे यास अटक केल्यावर त्याचा जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा पदभार देण्याकरिता वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने मोठा बाका प्रसंग रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य यंत्रणेवर आला आहे. अटक करण्यात आलेला डॉ. राजेंद्र खंडागळे हा मूळचा अहमदनगर येथील राहणारा असून, त्यांच्या अहमदनगरमधील घरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. (विशेष प्रतिनिधी)
अधिकाऱ्याने घेतली लाच
By admin | Updated: March 2, 2016 02:12 IST