- कमलाकर कांबळे, नवी मुंबईनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्र अर्थात ‘नैना’ क्षेत्रात बेकायदा बांधकामांचे पेव फुटले आहेत. सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाला बेकायदा बांधकामांना प्रतिबंध घालण्यात सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणांमुळे ‘नैना’ क्षेत्राच्या नियोजनाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.विमानतळ प्रभावित क्षेत्रात मोडणाऱ्या ठाणे, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण आणि उरण या तालुक्यातील २५ किलोमीटर क्षेत्रासाठी शासनाने सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार या क्षेत्राचा विकास प्रस्ताव आणि विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याची जबाबदारी आता सिडकोवर आली आहे. त्यामुळे या परिसरात कोणतेही बांधकाम किंवा विकास प्रकल्प राबविताना सिडकोची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत आणि स्थानिक प्राधिकरणाला बांधकाम परवानगी देण्याचे असलेले पूर्वीचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. असे असले तरी निर्धारित कालावधीत सिडकोने नैना क्षेत्राचा विकास आराखडा तयार न केल्याने या परिसरातील विकास प्रकल्प ठप्प पडले आहेत. इतकेच नव्हे, तर बांधकाम परवानगी देताना सिडकोने अनेक अटी व शर्ती लागू केल्याने विकासकांची कोंडी झाली आहे. याचा परिणाम म्हणून अनेकांनी परवानगी न घेताच बांधकामांचा सपाटा लावला आहे. ही बाब भूमाफियांच्या पथ्यावर पडल्याने रातोरात नवीन इमारती उभारल्या जात आहे. मध्यंतरी सिडकोने या क्षेत्रातील जवळपास तीनशे बांधकामांना नोटिसा बजावल्या होत्या. काही प्रमाणात कारवाई सुध्दा सुरू करण्यात आली होती. मात्र या कारवाईला न जुमानता अनधिकृत बांधकामे सुरूच असल्याने सिडकोसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सिडकोने पहिल्या टप्प्यातील त्या २३ गावांवर सध्या आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे नैना क्षेत्रात मोडणाऱ्या २७0 पैकी उर्वरित गावांच्या परिसरात भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. रातोरात येथे नवीन बांधकामे उभारली जात आहेत. या प्रकाराला आळा घालण्यात सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला अपयश येताना दिसत आहे.नैनाच्या पहिल्या टप्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या याच विभागावर आमचा फोकस असणार आहे. विकास आराखड्याला कोणत्याही प्रकारे धक्का लागू नये, त्यादृष्टीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. अतिक्रमणांना प्रतिबंध घालण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. भविष्यात नैनाच्या संपूर्ण परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त उपायोजना कराव्या लागणार आहेत. त्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज असून त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे.-संजय भाटीया, व्यवस्थापकी संचालक, सिडको
‘नैना’च्या मार्गात अडथळा
By admin | Updated: September 15, 2015 23:29 IST