नवी मुंबई : शहरात नायजेरियन नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. विशेषत: गाव-गावठाणातील बेकायदा घरांतून टोळ्यांनी राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांच्या कारवायांमुळे रहिवासी हैराण झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कोपरखैरणे गाव आणि परिसरात नायजेरियनचे वास्तव्य वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. विविध गुन्हेगारी कारवायांत नायजेरियन नागरिकांचा सहभाग असल्याचे अनेक प्रकरणांतून यापूर्वी उघड झाले आहे. सायबर सिटीत तर या नायजेरियन नागरिकांनी उच्छाद मांडल्याचे दिसून आले आहे. गाव - गावठाणात गरजेपोटीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बेकायदा इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतीतील भाडेतत्त्वावरील घरातून हे नायजेरियन वास्तव्य करीत आहेत. एका घरात चार ते पाच जण राहत असल्याने त्यांच्याकडून घरभाडेही अधिक मिळते. त्यामुळे घरमालकही कोणतीही चौकशी किंवा पोलीस परवानगी न घेता त्यांना घरे उपलब्ध करून देतात. सध्या कोपरखैरणेपाठोपाठ बोनकोडे, जुहूगाव व घणसोली परिसरात या नायजेरियनचे अधिक प्रमाणात वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे. रात्रीच्या वेळी दारू पिवून धिंगाणा घालणे, मोठमोठ्याने बोलणे, ओरडणे आदीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या नायजेरियन्सवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.काही महिन्यांपूर्वी बोनकोडे गावात काही नायजेरियन नागरिकांनी पोलिसांनाच धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर पोलिसांनी या नायजेरियन्सची झाडाझडती घेतली होती. इतकेच नव्हे, तर नायजेरियन्सना भाडेतत्त्वावर घरे न देण्याचे आवाहन घरमालकांना करण्यात आले होते. बोनकोडे येथून बाहेर पडलेले नायजेरियन्स आता कोपरखैरणे गावात आश्रय घेत असल्याचे आढळून आले आहे. (प्रतिनिधी)
कोपरखैरणे परिसरात नायजेरियनचा उपद्रव
By admin | Updated: March 15, 2016 00:57 IST