लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट-यूजी-२०२५ आज रविवारी होत असून दुपारी २ ते ५ दरम्यान होणाऱ्या या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यास परीक्षा केंद्रांवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विशेष उपाययोजना केल्या आहेत. यात कायदेशीर कारवाईसह संबंधितास परीक्षेस बसण्यावर तीन वर्षांसाठी बंदीच्या शिक्षेचा समावेश आहे.
नीट-यूजी परीक्षेत २०२४मध्ये झालेल्या गैरप्रकाराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यामुळे यंदा प्रचंड काळजी घेण्यात आली असून नियमही अधिक कडक करण्यात आले आहेत. यंदा बहुतांश परीक्षा केंद्र सरकारी किंवा अनुदानित शाळा-कॉलेजमध्ये देण्यात आले आहेत.
बंदीसह कायदेशीर कारवाईगैरप्रकार केल्याचे उघड झाल्यास संबंधितावर तीन वर्षांसाठी बंदी घातली जाईल. शिवाय या अयोग्य साधनांच्या वापरावर प्रतिबंध घालणारा कायदा-२०२४नुसार कारवाई केली जाणार आहे.
देशभरातील केंद्रांवर मॉक ड्रिलयंदा परीक्षा सुरळित पार पाडण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा सराव शनिवारी करण्यात आला. मोबाइल सिग्नल जामरची कार्यक्षमता, मनुष्यबळाची उपलब्धता आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण प्रक्रियेची सुसुत्रता याचा सराव केला गेला.
एमबीबीएसचे १४ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द : २०२४-२५ मध्ये नीट-यूजी परीक्षेत गैरप्रकार केल्याचे उघडकीस आल्यानंतर एमबीबीएसच्या १४ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. तर २६ विद्यार्थ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.