लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : बुधवारी होणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी, यासाठी दीड हजारहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर नेमण्यात आले आहेत. याशिवाय अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आलेली असल्यामुळे मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडेल, असा विश्वास पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी व्यक्त केला आहे.पनवेल महानगरपालिकेच्या २० प्रभागांतील ७८ जागांसाठी बुधवारी निवडणूक होत आहे. या निवडणूक रिंगणात एकूण ४१८ उमेदवार उतरले आहेत. महापालिकेच्या स्थापनेनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी त्यांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांच्या प्रतिष्ठेच्या लढाईदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची पुरेपूर खबरदारी पोलिसांनी घेतली आहे. त्याकरिता मतदानाच्या दिवशी दीड हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामध्ये १ उपआयुक्त, २ सहायक आयुक्त, २९ पोलीस निरीक्षक, १५४ सहायक, तसेच उपनिरीक्षक व १३०४ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. त्याशिवाय राज्य राखीव दलाच्या तुकडीसह मुख्यालयाचे विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे. तर प्रत्येक मतदान केंद्र व संवेदनशील ठिकाणांवर नजर ठेवण्यासाठी ४७ वाहनांमधून गस्त घातली जाणार आहे. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडेल, असाही विश्वास पोलीस आयुक्त नगराळे यांनी व्यक्त केला आहे.
मतदानामुळे पनवेलला आले छावणीचे स्वरूप
By admin | Updated: May 24, 2017 01:47 IST