पनवेल : नवीन वेळापत्रकात सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल - ठाणे गाड्या न वाढवता प्रवाशांच्या मागणीला प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.पनवेल शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. त्यामुळे नागरीकरणात वाढ झाली आहे. याशिवाय अलिबाग, पेण व रोह्यापासून रोज नोकरी -धंद्यासाठी जाणारे पनवेल येथे येऊन रेल्वेने मुंबई, ठाणे व कल्याण येथे जात असतात. पनवेल रेल्वे स्टेशनवरून मुंबईकडे जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत. मात्र, ठाण्याकडे जाण्यासाठी सकाळी ८.०४ व नंतर ९.०२ पर्यंत गाडी नाही. त्यामुळे नोकरीसाठी जाणाºयांना घरातून लवकर निघून नेरूळला जाऊन गाडी बदलावी लागते. गर्दीच्या वेळी महिलांना मोठी कसरत करावी लागते. यासाठी सकाळी ८.३० वाजता ठाणे गाडीची मागणी प्रवाशांनी केली होती. नवीन पनवेलमधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघानेही याबाबत रेल्वेला निवेदन दिले होते.अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन या मार्गावर जादा लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांना पत्र देण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले.
सकाळच्या सत्रात जादा लोकलची मागणी, रेल्वे प्रशासन उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 04:31 IST