नवी मुंबई : कोरोनामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती निवडणूक पाच महिने रखडली होती. अखेर ही निवडणूक ३१ आॅगस्टला घेण्याचे निश्चित झाले आहे.बाजार समिती निवडणुकीचा निकाल २ मार्चला घोषित झाला. जिल्हा परिषदेनंतर या निवडणुकीतही महाविकास आघाडीचा पॅटर्न राबविण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व शेकाप आघाडीने बहुमत मिळविले आहे. बाजार समितीमधील १२ शेतकरी प्रतिनिधींपैकी कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी चार सदस्य, एक राष्ट्रवादीशी जवळीक असलेले अपक्ष, शेकाप व शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य आणि एक शिवसेना बंडखोर सदस्य असे संख्याबळ आहे. व्यापारी व कामगार प्रतिनिधीमधील चार राष्ट्रवादीशी संबंधित व दोन तटस्थ प्रतिनिधी आहेत.बाजार समिती मधील १८ सदस्य सभापती व उपसभापती पदासाठी मतदान करू शकतात. १२ शेतकरी प्रतिनिधींपैकी एकाची सभापती व उपसभापती पदावर नियुक्ती केली जाते. बाजार समितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार शशिकांत शिंदे यांचे वर्चस्व आहे. महाविकास आघाडीचे नेते कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २ मार्चला निकाल लागल्यानंतर कोरोना चा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे निवड लांबणीवर पडली होती. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी १९ आॅगस्टला जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांना पत्र देऊन निवडणूक घेण्याची शिफारस केली होती. त्या अनुषंगाने ३१ आॅगस्टला निवडणूक होणार असून इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडणुकीसाठी मुहूर्त सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 02:39 IST