नवी मुंबई : महापालिकेचा अर्थसंकल्प वास्तवादी नसून दिशाभूल करणारा आहे. नगररचना विभागाचे उत्पन्न गृहीत धरलेले नाही. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) मध्ये प्रचंड घोटाळा असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवकांनी केला असून, काँगे्रसनेही उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याची टीका केली आहे. अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेमध्ये पहिल्या दिवशी शिवसेना, भाजपासह काँगे्रस नगरसेवकांनी पालिकेच्या कारभारावर टीका केली. शिवसेनेच्या किशोर पाटकर यांनी नगररचना विभागाला मिळणाऱ्या उत्पन्नाविषयी योग्य तपशील दिला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. याशिवाय कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत मनपा क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनी शहराच्या विकासासाठी हातभार लावणे आवश्यक आहे. परंतू या निधीचा वापर होत नसून यामध्ये मोठा घोटाळा आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी किशोर पाटकर यांनी केली. काँगे्रसच्या मंदाकिनी म्हात्रे यांनीही अर्थसंकल्पातील आकडे खोटे असल्याचे निदर्शनास आणून दिले. शहरात सद्य:स्थितीमध्ये १,२०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. अत्यावश्यक सेवांवर जवळपास ७०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. यानंतर पुढील वर्षी नवीन कामे करण्यासाठी निधी कोठून मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. उपकर, सेस, एलबीटी, पाणीपुरवठा व इतर विभागांमधील त्रुटींवरही बोट ठेवले. बहादूर बिष्ट यांनी झोपडपट्टीमधील रहिवाशांसाठी काहीच सुविधा नसल्याचे मत व्यक्त केले. प्रभाग ८ मधील एकही कामाचा समावेश नसल्याचे निदर्शनास आणून दिले. करण मढवी, चेतन नाईक, रामचंद्र घरत, अशोक गुरखे यांनीही पालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी उपाययोजना सुचविल्या. अर्थसंकल्पातील त्रुटीही निदर्शनास आणून दिल्या. ऐरोलीतील नगरसेवक संजू वाडे यांनी पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. शहरातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. पालिकेच्या उपकर विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. नवीन रुग्णालयांची बांधकामे पूर्ण होऊनही ती सुरू केली जात नाहीत. वाशी रुग्णालयामध्ये नर्सेसची संख्या कमी आहे. आवश्यक कर्मचारी भरले जात नाहीत. २४ तास पाणी देण्याच्या घोषणा केल्या जातात, परंतु प्रत्यक्षात तीन ते चार दिवस पाणी मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीसाठी अर्थसंकल्पात ठोस तरतूद नसल्याची खंत व्यक्त केली. पालिकेने यासाठी किमान ५० लाख रुपयांची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली. डास मारायलाही कर लावाशिवसेना नगरसेवक रामदास पवळे यांनी डासांच्या उपद्रवाकडे लक्ष वेधले. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. डेंगू, मलेरियाची साथ पसरत आहे. पालिकेला पैसे कमी पडत असतील तर डासांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र कर लावा; परंतु नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करा, असा टोला मारला.अर्थसंकल्प वास्तवादी नाही. नगररचना विभागाच्या उत्पन्नाकडे दुर्लक्ष केले आहे. सीएसआरमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याची चौकशी होणे आवश्यक आहे. - किशोर पाटकर, नगरसेवक, शिवसेनाअर्थसंकल्प फसवणूक करणारा आहे. शहरात सद्य:स्थितीमध्ये १,२०० कोटीची कामे सुरू आहेत. याशिवाय पुढील वर्षभरात ७०० कोटी अत्यावश्यक सेवांवर खर्च करावे लागणार आहेत. १,९०० कोटी यासाठीच गेल्यानंतर नवीन कामांसाठी निधी कोठून उपलब्ध होणार. - मंदाकिनी म्हात्रे, नगरसेविका, राष्ट्रवादी
पालिकेच्या अर्थसंकल्पातून जनतेची दिशाभूल
By admin | Updated: March 5, 2016 02:13 IST