लोकमत न्यूज नेटवर्कआगरदांडा : मुरु डमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व इतर समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी, मुरुड तहसीलदार दालनात गुरुवारी तहसीलदार दिलीप यादव यांनी वीजमंडळाचे अधिकारी सचिन येरेकर, मानवअधिकारी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जहीद फकजी व त्यांचे सहकारी यांच्याबरोबर संयुक्त सभा नुकतीच घेतली. जवळपास एक ते दीड महिन्यापासून संपूर्ण मुरुड तालुक्यामध्ये वीज वितरण कंपनीचा वीजपुरवठ्याबाबत सतत खेळखंडोबा चालू आहे. यामुळे संपूर्ण तालुक्याची जनता त्रस्त झाली आहे. याबाबत प्रश्न विचारला असता, वीज मंडळाचे अधिकारी सचिन येरेकर म्हणाले की, आपली मेनलाइन धाटाव-रोहा या जंगल भागातून येते. जर धाटावमधून लाइन बंद पडली, तर संपूर्ण तालुक्याचा विद्युत पुरवठा खंडित होतो. लवकरच सबस्टेशनचे काम पूर्ण होणार आहे, तेव्हा मुरु डमधील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही. मात्र, सध्या विद्युत पुरवठा खंडित झाल्याने जो नागरिकांना त्रास होतो, त्याबद्दल येरेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. मानवअधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जहीद फकजी म्हणाले, भारनियमन आठ तास घेतले जाते ते चार -चार तास घ्यावे, अशी विनंती केली. या लोडशेडिंगमुळे छोट्या उद्योग-धंद्यांवर परिणाम होतो. तरी ही विनंती मान्य करावी, असे या वेळी सांगण्यात आले. वीजमंडळाचे अधिकारी सचिन येरेकर यांनी याचा विचार केला जाईल, असे सांगितले.जेव्हा आपल्या तालुक्याचा विद्युत पुरवठा खंडित होतो, नागरिकांकडून भ्रमणध्वनीद्वारे विचारणा केली जाते, त्या वेळी तुमचे सहकारी उत्तर देत नाहीत. जर फोन उचलला गेला नाही, तर नागरिक आॅफिसमध्ये जातात, तेथे तुमचे अधिकारी जागेवर नसतात, जर नागरिकांचा राग अनावर झाला आणि तोडफोड झाली तर याची जबाबदारी कोणाची? असाही प्रश्न विचारला गेला. सचिन येरेकर म्हणाले, हा प्रश्न गंभीर आहे, तरी माझ्या सहकाऱ्यांना यासंदर्भात कडक सूचना देण्यात येतील. मानवअधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जहीद फकजी म्हणाले की, रमजान महिन्यात उपवास सोडण्यावेळी विद्युत पुरवठा खंडित केला जातो. त्यावर वीजमंडळाचे अधिकारी म्हणाले की, आपल्याकडून विद्युुत पुरवठा खंडित होत नाही, तरी या वेळी योग्य काळजी घेऊ, असे सांगण्यात आले. मुरु ड तहसीलदार दिलीप यादव यांनी पावसाळ्यापूर्वी पूर्ण काम करून, वीज न खंडित होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या. तसेच तुमच्या सहकाऱ्यांना आलेला नागरिकांचा फोन उचलून त्यांना सहकार्य करावे, असे ठणकावले. या वेळी विलायत उलडे, अब्दुल रहेमान कबले, अंकित गुरव आदी उपस्थित होते.
मुरु ड तहसीलदार कार्यालयात सभा : वीज वितरणच्या कारभाराबाबत नाराजी
By admin | Updated: May 29, 2017 06:25 IST