नवी मुंबई : सिडकोने अत्याधुनिक रेल्वे स्टेशन उभारून त्यांची देखभाल करण्यासाठी सफाई ठेकेदार नियुक्त केले आहेत. परंतु उचललेला कचरा टाकण्यासाठीची यंत्रणाच तयार केली नाही. साफसफाई करून रेल्वे पटरीजवळच कचरा जाळला जात असून, याविषयी पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशातील सर्वात अत्याधुनिक रेल्वे स्टेशन नवी मुंबईमध्ये आहेत. वाशी, बेलापूरमध्ये रेल्वे स्टेशनच्या इमारतीमध्ये आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्क उभारले असून, इतर सर्वच स्टेशनमध्ये व्यावसायिक संकुल तयार केले आहे. येथील साफसफाईसाठी प्रत्येक स्टेशनमध्ये ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. सफाई कामगार रेल्वे स्टेशन इमारतीची साफसफाई करतात. या ठिकाणी बसलेला कचरा उचलून तो रेल्वे पटरीच्या बाजूला टाकला जातो. वास्तविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीची यंत्रणा असणे आवश्यक आहे. स्टेशनच्या बाहेरील कचरा कुंडीत टाकला तरी महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून तो डंपिंग ग्राउंडवर टाकला जाईल. परंतु असे न करता सर्व कचरा रेल्वे पटरीजवळ जाळला जात आहे. कचरा जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. पावसाळ्यात वाढलेले गवत सुकले असून, त्याला आग लागण्याचीही शक्यता आहे. सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये रोज सायंकाळी कचऱ्याला आग लावली जात आहे. सिडकोने या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य यंत्रणा करावी अन्यथा पर्यावरण विभागाकडे तक्रार करण्याचा इशारा रेल्वे स्टेशन इमारतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
कचरा उचलण्यासाठी यंत्रणा अपूर्ण
By admin | Updated: December 29, 2015 00:37 IST