नवी मुंबई : पतपेढी सुरू करण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.जवाहरलाल गुप्ता असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. वाशीगाव येथील राहिवासी गुप्ता याने परिचयाचा गैरफायदा घेत अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. मुंबईत स्वत:ची साई गणेश को-आॅप. क्रेडिट सोसायटी असून, वाशीतही शाखा सुरू करायची असल्याचे त्याने अनेकांना सांगितले होते. तसेच पतपेढीत संचालक पदावर घेण्याचे तसेच दाम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून त्याने अनेकांकडून गुंतवणूक करून घेतली होती. त्यानुसार इच्छुकांनी १ ते ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम जवाहरलाल गुप्ता याच्याकडे दिली होती. परंतु एक वर्षाचा कालावधी उलटूनही त्याने वाशीत पतपेढी सुरू केलेली नव्हती अथवा घेतलेल्या पैशाचीदेखील परतफेड केली नाही. यामुळे फसवणूक झालेले श्रीराम गुप्ता, रामजनम गुप्ता, मनोज गुप्ता यांच्यासह अनेकांनी वाशी पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे जवाहरलाल गुप्ता याला अटक केल्याचे पोलीस निरीक्षक सूरज पाडवी यांनी सांगितले.नागरिकांचे घेतलेले पैसे परत दिल्याचे भासवण्याकरिता त्याने संबंधितांच्या बनावट सह्या करून पावत्यादेखील तयार केलेल्या होत्या. त्यानुसार या प्रकरणात अनेकांची फसवणूक होऊन सुमारे ५० लाखांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याची शक्यता आहे. नमकीनची विक्री करीत व्यावसायिकांशी मैत्री करून गुप्ता याने अनेकांशी ओळखी वाढवल्या होत्या. याच ओळखीचा गैरफायदा घेत त्याने पतपेढीत गुंतवणुकीच्या बहाण्याने त्यांची फसवणूक केली. (प्रतिनिधी)
पतपेढीच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक
By admin | Updated: October 10, 2015 00:40 IST