म्हसळा : तालुक्यातील खामगाव येथे मोहल्ल्यात राहणाऱ्या निसार जोगीलकर व त्यांचे दोन बंधू यांच्या सामायिक घराला सोमवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आग लागली तेव्हा घरात कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र आगीत जोगीलकर यांचे घर आणि घरातील जीवनाश्यक व मौल्यवान वस्तू पूर्णत: जळाल्याने ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहेम्हसळा तालुक्यातील खामगाव मोहल्ल्यात निसार अ. अब्दुल गणी जोगीलकर (४५), बशीर अब्दुल गणी जोगीलकर व मंजर अ. अब्दुल गणी जोगीलकर यांचे सामायिक राहते घर होते. सोमवारी सर्व जण पाहुणे म्हणून बाहेरगावी गेले असताना सायंकाळी ४.३० सुमारास घराला अचानक आग लागली. या आगीमध्ये त्यांच्या घराचे नुकसान झाले असून आगीमध्ये महत्वाच्या चीजवस्तू घरासकट जळून खाक झाल्या. यामध्ये निसार जोगीलकर यांचे १५ लाख ९६ हजार २२० रु ., बशीर जोगीलकर यांचे ६ लाख ७५ हजार ४०० रु ., तर मंजर जोगीलकर यांचे २ लाख ३३ हजार रुपये व घराचे ५ लाख ३५ हजार असे एकूण ३० लाख ३९ हजार ६०० रु.चे नुकसान झाल्याचे महसूल विभागाच्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.या घटनेची म्हसळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक एस. बी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. (वार्ताहर)
खामगाव येथे घराला भीषण आग
By admin | Updated: March 9, 2016 03:43 IST