नवी मुंबई : मान्सूनपूर्व उकाडा, त्यात सुरु असलेल्या विजेच्या खेळामुळे नवी मुंबईकर त्रस्त झालेत. कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, घणसोली, बेलापूर या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तुर्भे, कोपरखैरणे परिसरात तर दिवसातून तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने या परिसरातील नागरिक घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहे. आठवडाभरापासून सुरु असलेल्या विजेच्या खेळामुळे दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यापूर्वी आठवड्यातून एक दिवस वीजपुरवठा खंडित केला जात होता मात्र आता सोमवारपासून दररोज विजेचा लपंडाव सुरु आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रार केली असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या समस्येबाबत महावितरणशी संपर्क साधला असता त्यांनी मान्सूनपूर्व काम सुरु असल्याचे सांगितले. बेलापूर परिसरातही बुधवारी दुपारी तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. विजेच्या लपंडावामुळे संतप्त नागरिकांनी वेळ आल्यास आंदोलन करण्याचा इशारा महावितरणला दिला आहे. तुर्भे, कोपरखैरणे परिसरात तर दोन आठवड्यांपासून विजेचा खेळ सुरु असून काही महिन्यांपूर्वीदेखील या परिसरात दिवसा तसेच रात्रीही वीजपुरवठा खंडित केला जात असल्याची माहिती नागरिकांनी दिली.भारनियमनामुळे ग्रामीण नागरिक त्रस्तपनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज सहा ते सात तास भारनियमन करण्यात येत आहे. आधीच उकाड्याने हैराण झालेले नागरिक त्यामुळे भायनियमनामुळे आणखी हैराण झाले आहेत. वीज तुटवडा भरून न निघाल्यास या भारनियमनात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे भारनियमन किती दिवस करण्यात येणार आहे, याबाबतही महावितरणकडून सांगण्यात आलेले नाही. गव्हाण, नेरे, पनवेल १, पारगाव, वावंजे या पाच फिडरमध्ये महावितरणचे जवळपास ७० हजार ग्राहक असून त्यांना भारनियमनाचा फटका बसत आहे. तालुक्यातील ५ फिडरवर दररोज सहा ते सात तास भारनियमन करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. आधीच उन्हाचा उकाडा त्यात भारनियमन केल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. पनवेलमधील ग्रामीण भागातील नागरिकांना एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे तर दुसरीकडे भारनियमनामुळे ते त्रस्त आहेत. यासंदर्भात महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल मस्के यांच्याकडे विचारणा केली असता, तांत्रिक अडचणींमुळे भारनियमन घेण्यात येत असून ते तीन ते चार दिवस असेल असे सांगण्यात आले.
शहरात विजेचा लपंडाव सुरू
By admin | Updated: June 3, 2016 02:04 IST