पनवेल : जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने वर्चस्व राखले आहे, तर भाजपाने दुसरा क्र मांक गाठला असून, शिवसेनेला मात्र भोपळाही फोडता आला नाही. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयोत्सव साजरा केला.जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी पार पडली होती. रायगड जिल्हा परिषदेच्या आठ व पनवेल पंचायत समितीच्या सोळा जागांसाठी निवडणूक रिंगणात ६२ उमेदवार होते. पनवेलमधून ८०.३३ टक्के मतदान झाल्याने कुणाचा विजय व कुणाचा पराभव होणार हे पाहण्यासाठी पनवेल शहरातील व्ही.के. हायस्कूल येथे मतमोजणी झाली. जिल्हा परिषदेवर शेकाप आघाडीने ६ जागा मिळवल्या तर भाजपाला दोन जागांवर समाधान मानावे लागले. तर पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकाप आघाडीला १० जागा तर भाजपाने जोरदार मुसंडी मारत ६ जागांवर विजय मिळवला. या ६ जागांमुळे तालुक्यात भाजपा आपले पाय पसरत असल्याचे दिसून आले. मात्र स्वबळावर लढणाऱ्या शिवसेनेला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीत ते भोपळा देखील फोडू शकले नाहीत.जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी शेकापने ८ उमेदवार , भाजपाने ६, काँग्रेसने ०, शिवसेनेने ५, बसपा १, भारिप १, अपक्ष २ असे २३ उमेदवार तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी शेकापने १२, भाजपा १४, काँग्रेस ४, शिवसेना ७, अपक्ष २ असे ३९ उमेदवार उभे केले होते. यापैकी गुरु वारी झालेल्या मतमोजणीत जिल्हा परिषदेत शेकाप आघाडीचे ६ तर भाजपाचे २ उमेदवार विजयी झाले. यात भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांच्या पत्नी लीना पाटील यांचा राजेश्री भोपी यांनी ५२० मतांनी पराभव केला. राजेश्री भोपी यांनी सुकापूर गण सोडून पळस्पे गणातून उमेदवारी लढवली. तर शेकापचे माजी सभापती काशिनाथ पाटील यांनी भाजपाच्या प्रकाश खैरे यांचा पंधराशेहून अधिक मतांनी पराभव करत एकतर्फी विजय संपादन केला. शेकापमधून भाजपामध्ये गेलेले एकनाथ देशेकर यांच्या पत्नी कमला देशेकर यांना पंचायत समितीच्या चिंध्रण गणातून पराभव पत्करावा लागला आहे. शेकापच्या वृषाली देशेकर यांनी त्यांचा ३७६ मतांनी पराभव केला आहे. पंचायत समितीच्या आदई गणातून भाजपाचे भूपेंद्र पाटील विजयी झाले असून २०१२ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. भाजपाचे विनोद साबळे यांना देखील गुळसुंदे गणातून पराभव पत्करावा लागला. भाजपातर्फे पंचायत समितीच्या गुळसुंदे गणातून उमेदवारी लढवणारे एकमेव पीएचडी उमेदवार पराभूत झाले आहेत. शेकापच्या जगदीश पवार यांनी त्यांचा १३०० हून अधिक मतांनी पराभव केला आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेकापने वावंजे, पळस्पे, गुळसुंदे, वडघर, गव्हाण, केळवणे तर भाजपाने नेरे, पाली देवद येथे विजय प्राप्त केला. पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकापने पाली देवद, विचुंबे, केळवणे, कोन, गुळसुंदे, वावंजे, चिंध्रण येथे तर भाजपाने आदई, वहाळ, गव्हाण, आपटा, वडघर, नेरे आणि काँग्रेसने पळस्पे, पोयंजे, करंजाडे या गणात विजय संपादन केला. भाजपाने गव्हाण (उलवा) येथे प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणले होते, मात्र पनवेलमध्ये ते कोणताही करिष्मा करू शकलेले नाहीत. काही महिन्यांतच पनवेल महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होणार आहे. मात्र शिवसेना व भाजपा यांची युती होणार की नाही हे येणारा काळच ठरविणार आहे. पनवेलमधून शेकापने निवडणुकीत आपला गड राखला आहे.
पनवेलमध्ये आघाडीचे वर्चस्व
By admin | Updated: February 24, 2017 08:02 IST