लोकमत न्यूज नेटवर्कउरण : मुुंबई-मोरा जलमार्गावर ओहोटीमुळे साईलीला ही प्रवासी लाँच गाळात रुतल्याने प्रवाशांचे फार हाल झाले. पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर भरतीच्या पाण्याने प्रवासी लाँच तरंगल्यानंतरच ८० प्रवाशांना बंदर गाठता आले. भाऊचा धक्का ते मोरादरम्यान साईलीला ही प्रवासी लाँच ८० प्रवाशांना घेऊन निघाली होती. मात्र मोरा जेट्टीजवळ येताच साईलीला लाँच गाळात रुतली. पाण्यावाचून सुमारे पाऊण तास ८० प्रवासी ताटकळत होते. पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर भरतीच्या पाण्यावर रुतलेली लाँच तरंगली. त्यानंतरच प्रवाशांना बंदर गाठता आले. याआधी सकाळी इंदुमती लाँच गाळात रुतली होती. मात्र मोठ्या प्रयत्नाने लाँच बाहेर काढणे नाविकाला शक्य झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता, अशी माहिती मोरा मेरिटाइम बोर्डाचे निरीक्षक ए. एन. सोनावणे यांनी दिली. मोरा बंदरातील गाळ योग्यरीत्या काढला नसल्यानेच अशा घटना घडत आहेत़
मोरा बंदरात रुतली प्रवासी लाँच
By admin | Updated: May 31, 2017 03:47 IST