वैभव गायकर, पनवेलऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पनवेल शहरात आजही त्याच्या खुणा पाहायला मिळतात. त्यापैकी एक कर्नाळा किल्ला-अभयारण्य. राज्यासह, देशभरातील पर्यटक वर्षभर याठिकाणी भेट देत असतात. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी व अभयारण्याच्या देखभालीसाठी वनविभागाकडून विविध उपाययोजना राबविल्या जातात. त्याचाच भाग म्हणून परिसरावर चोख नजर ठेवण्यासाठी विभागात अद्ययावत जिप्सी देण्यात आल्या आहे. अभयारण्यात गस्त घालण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना हे वाहन सोयीचे पडणार आहे.कर्नाळा अभयारण्य परिसरात एकूण १३४ प्रजातीचे दुर्मीळ पक्षी आहेत. याव्यतिरिक्त ३८ प्रजातीचे स्थलांतरित पक्षी आहेत. पक्षी अभ्यासक कर्नाळा अभयारण्याला आवर्जून भेट देतात. ऐतिहासिक कर्नाळा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक याठिकाणी मोठ्या संख्येने येतात. काही महिन्यांपूर्वी अभयारण्यात बिबट्याही आढळला होता. एका संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये बिबट्याचे चित्र सीसीटीव्हीत कैद झाले होते. याव्यतिरिक्त रानटी डुकरे व काही हिंस्त्र पशूही जंगलात असण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात इसिसच्या अतिरेक्यांनी अभयारण्याची रेकी केल्याचे वृत्त समोर आले होते. अभयारण्यात गस्त घालणे सोयीचे जावे त्याचप्रमाणे वन कर्मचाऱ्यांनाही सुरक्षित वाटावे, यासाठी जिप्सीचा पर्याय सुचविण्यात आला होता. तसा प्रस्ताव वनविभागाकडे पाठविण्यात आला होता. गुड लाइट्स स्वरूपाची ही जिप्सी असल्याने मालवाहतुकीसाठीही तिचा वापर होऊ शकेल. वनसंवर्धनाबाबत जनजागृती, वणवा नियंत्रणात मदतीसाठी जिप्सीचा उपयोग करण्यात येणार आहे.
कर्नाळा अभयारण्यात अद्ययावत जिप्सी
By admin | Updated: September 7, 2016 02:58 IST